याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार ग्रामस्थ मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून नाटे पोलीसांनी शाळेचे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक व दोन ग्रामस्थ अशा ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तांदूळ व गाडीसह एकूण ३ लाख ७ हजार ५०० रूपयांचा माल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
मध्यरात्रीची घटना – पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या अधिक माहितीनुसार बुधवारी दि.५ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता नाटेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौणिमेचा उत्सव सुरू असताना मकरंद मधुसुदन धाक्रस (वय ३७ रा.नाटे) हे मंदिरात उपस्थित होते. त्याच दरम्यान मध्यरात्री १.२४ वाजता मनोज आडविलकर (रा. नाटे) यांनी त्यांना फोन करून माहिती दिली की नाटेनगर विद्यामंदिर येथे मुलांच्या पोषण आहाराकरीता आलेला तांदूळ चोरून नेताना गावक-यांनी एक गाडी पकडली आहे. त्यानंतर धाक्रस यांनी शाळेचे शिपाई रविकांत भगवान धामापूरकर यांना फोन करून ते शाळेत पोहचले. शाळेच्या पटांगणात अशोक लेलॅण्ड कंपनीची गाडी उभी होती. त्या गाडीत ५० किलो वजनाची एकूण दहा पोती पोषण आहाराची भरलेली आढळली.
संशय आल्याने गाडी थांबविली – पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना पुढे सांगितले की, शाळेच्या पटांगणातून गाडी बाहेर पडत असताना महम्मद इसा आयाज म्हसकर व महमद तलहा हनीफ हातोडकर (दोघ रा. साखरीनाटे) यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी ही गाडी थांबविली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने शाळेच्या आवारात जमा झाले. नाटेचे सरपंच संदीप रामचंद बांदकर हे देखील शाळेच्या मैदानावर उपस्थित होते अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
चौकशीची मागणी – शालेय पोषण आहारातील तांदळाची किंमत अंदाजे ७ हजार ५०० रूपये इतकी असून गाडीची किंमत ३ लाख अशी मिळून सुमारे ३ लाख सात हजार ५०० रूपयांचा माल ताब्यात घेण्यात आला असल्याचेही पोलीसांनी सांगितले. या प्रकरणी मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून पुढील कारवाई सुरू केली आहे. शासनाच्या मालम त्तेची चोरी, अत्यावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकरंद धाक्रस यांच्या लेखी तक्रारीवरून सागरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३०५ (व), ३ (५) तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.फौ यु.सी. पिलणकर (नाटे) हे करत आहेत. यापूर्वीही असे प्रकार झाले नसतील कशावरून असाही प्रश्न उपस्थित केला जात असून पोलीसांनी याच्या मुळाशी जाऊन शोध घ्यावा, हा तांदूळ नेमका कोणाला विकला जाणार होता याचाही शोध घ्यावा अशी मागणी नाटे ग्रामस्थांनी केली आहे.

