यंदाच्या मोसमातील आयपीएलच्या मेघा लिलावाचे पडघम वाजायला लागले “आहेत. सर्व संघ मालक आणि आयपीएल प्रशासन यांच्याच चर्चाच्या फेऱ्या झालेल्या आहेत. त्यानुसार ५+१चे सूत्र म्हणजेच पाच खेळाडू कायम ठेवता येईल आणि एक खेळाडू ‘राइट टू मॅच’ (आरटीएम) नुसार संघात पुन्हा घेता येऊ शकेल. नजिकच्या काळात होणारा यंदाचा आयपीएल लिलाव खेळाडूंवर पैशाची मोठी उधळण करणारा ठरणार आहे. प्रत्येक संघांसाठी ११५ ते १२० कोटींची रक्कम असू शकेल, असे सांगण्यात येत आहे; पण संघात किती खेळाडू कायम ठेवता येईल, हा सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे.
बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या बंगळूरमध्ये हीत आहे. त्याचवेळी आयपीएल प्रशासनाचीही बैठक होणार आहे आणि त्यात किती खेळाडू कायम ठेवता येतील, हा निर्णय अपेक्षित आहे. पाच खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय होऊ शकेल, असे सूत्रांचे म्हणणे असले तरी यात परदेशी खेळाडू किती असतील, याबाबत संभ्रम आहे. २०१८च्या मोसमासाठी झालेल्या लिलावातही पाच खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय झाला होता; परंतु यात तीन खेळाडू थेटपणे कायम ठेवण्याचा किंवा तीन खेळाडू ‘आरटीएम’द्वारे संघात घेता आले होते. यात जास्तीत जास्त तीन भारतीय खेळाडूंचा समावेश होता.
‘आरटीएम’ कार्ड म्हणजे काय ? – राइट टू मॅच अर्थात आरटीएम कार्ड म्हणजे आपल्या संघातील एखादा खेळाडू लिलावात असला आणि त्याला कितीही बोली लागली तरी तो आपल्या संघात आरटीएम कार्ड वापरून पुन्हा आपल्या संघात घेता येते. २०२२ मध्ये झालेला मेघा लिलावाच्या वेळी गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स असे दोन नवे संघ आले होते. त्यांनाही अव्वल खेळाडू मिळावे, म्हणून उर्वरित आठ संघांसाठी केवळ चार खेळाडू कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, त्यावेळी प्रत्येक संघांसाठी ९० कोटींची रक्कम होती.
धोनीसाठी नियमात बदल – आयपीएल लिलावात ‘कॅप्ड’ म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि ‘अनकॅप्ड’ खेळाडू असे दोन प्रकार आहेत. जे खेळाडू पाच वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत किंवा पाच वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेले नाहीत, अशांना ‘अनकॅप्ड’ या प्रकारात ठेवण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आग्रही आहे, त्यामुळे त्यांना महेंद्रसिंग धोनीला कमीत कमी किमतीत संघात कायम ठेवता येईल. हा निर्णय २०२१ पर्यंत अस्तित्वात होता. त्यावेळी ‘अनकॅप्ड’ खेळाडूसाठी केवळ चार कोटी एवढी रक्कम होती.