पापलेट राज्यमासा म्हणून घोषित केल्यानंतर म्हाकुळ, कोळंबी, बांगडा, तारली, पापलेट, गेदर, बोंबील, धोमा, घोळ, लेप यासह ५४ माशांचे आकारमान निश्चित करून त्यांची खरेदी, विक्री आणि मासा पकडण्यावर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. याच्या फायद्या-तोट्यापासून ते निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत, मात्र शासन निर्णय आल्यानंतर त्याची अंमलबाजवणी करण्यासाठी कोकणीतील समुद्रकिनारी जिल्ह्यात मत्स्य विभाग सज्ज झाला आहे. सुरुवातील जनजागृतीवर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईसह कोकणाला लाभलेल्या किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात माशांची खरेदी-विक्री होत असते; परंतु गेल्या काही वर्षांत छोट्या आकाराचे मासे मारले जाऊ लागल्यामुळे काही माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
त्यांचे संवर्धन करण्यासाठी शासनाने छोटे मासे पकडण्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. माशांचं आकारमान निश्चित करून त्यांच्या पकडण्यापासून ते खरेदी-विक्रीपर्यंत राज्य सरकारनं निर्बंध आणले आहेत. शेवंड, म्हाकुळ, कोळंबीच्या काही प्रजाती, काही शार्क, करकटा बांगडा, हलवा, तारली, मांदेली, पापलेट, गेदर, बोंबील, धोमा, घोळ, लेप अशा ५४ प्रकारच्या मासळीच्या किमान कायदेशीर आकारमानाची शिफारस करण्यात आली आहे. निश्चित केलेल्या आकरामानापेक्षा आकाराने लहान असलेला मासा पकडता येणार नाही. त्याशिवाय त्याची खरेदी-विक्री करता येणार नाही. मासे संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समुद्रात जाळी टाकून मासे पकडत असताना त्याचे आकरमान समजत नाही. याबाबत योग्य त्या सूचना करणे आवश्यक असल्याचे मच्छीमारांचे मत आहे.
निश्चित केलेले आकारमान – आकारमान निश्चित केलेल्या माशांमध्ये सुरमई ३७० मिमी, बांगडा १४० मिमी, सरंगा १७० मिमी, तारली १०० मिमी, सिल्वर पापलेट १३५ मिमी, चायनीज पापलेट १४० मिमी, भारतीय म्हाकूळ १०० मिमी, झिंगा कोळंबी ९० मिमी, मांदेली ११५ मिमी, मुंबई बोंबील १८० मिमी, खेकडा ५० ते ९० यासह घोळ, मांदेली, राणी, सौंदाळा, ढोमा, प्रजाती मिळून ५४ प्रजातींचा समावेश आहे.