केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण योजनेतून महावितरण कंपनीला ५७२ कोटीचा प्रकल्प मंजूर झाला आहे. या योजनेतून मंडणगड, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी किनारपट्टीवर भुमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. चक्रीवादळ, अतिवृष्टीमध्येही किनारी भागातील विद्युत ग्राहकांना विनाखंडित सेवा मिळावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त उपक्रमातून हे काम सुरू झाले आहे. महावितरण कंपनीने याचा प्रस्ताव पाठवला होता. त्याला मंजूरी मिळाली आहे. सुमारे ५७२ कोटीच्या या प्रकल्पातुन किनारपट्टी भागात २ किमी अंतरापर्यंतच्या वाहिन्या भुमिगत केल्या जाणार आहेत.
यामध्ये लघुदाब २२०० किमी तर उच्चदाब ५५० किमी विद्युत वाहिन्यांचा समावेश आहे. यापूर्वी झालेल्या तोक्ते, निसर्ग चक्रीवादळाने किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात वित्त व जीवीत हानी झाली. यात कोट्यवधीचे नुकसान झाले. भविष्यात कोकण किनारपट्टीवर अशा प्रकारचे चक्री वादळे धडकण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून भुमिगत विद्युत वाहिन्यांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये केंद्र शासनाच्या ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के वाटा राहणार आहे.
दापोली किनारपट्टीवर लघुदाब ३५० किमी भुमिहत वाहिन्यांसाठी ३६ कोटी, तर उच्चदाब १३० किमीसाठी ४८ कोटी मंजुर आहेत. मंडणगड – लघुदाब ६५ किमीसाठी ७ कोटी तर उच्चदाब २० किमीसाठी ७ कोटी, रत्नागिरी- लघुदाब ४९१ किमीसाठी ४६ कोटी तर उच्चदाब ३१० किमी ५७ कोटी मंजूर आहेत. राजापूर- लघुदाब २६३ किमीसाठी २८ कोटी तर उच्चदाब. ९६ किमी २२ कोटी. गुहागर- लघुदाब ४८० किम ीसाठी ४९ कोटी तर उच्चदाब – २६० किमी ११४ कोटी, दापोली तालुक्यात किनारपट्टीभागात लघुदाब ३५० किमीला ३६ कोटी तर उच्चदाब १३० किमीसाठी ४८ कोटी मंजूर आहेत. या प्रकल्पासाठी एजन्सी नेमली असून काम सुरू झाले आहे.