पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा अबंधित निधीचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींसाठी १६ कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील नुकत्याच निवडणूक झालेल्या ५५ ग्रामपंचायतींना बंधित आणि अबंधितची दोन्ही हप्ते अशी तब्बल ७ कोटी ६२ लाख रुपयांचा विकासनिधी मिळाला आहे. केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी २०२३-२४ च्या अबंधित निधीच्या पहिल्या हप्त्यापोटी राज्याला ७१२ कोटींचा निधी राज्याकडे प्राप्त झाला आहे.
जिल्ह्यासाठी १६ कोटी ४० लाख रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीतीकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई यांनी लोकसंख्येनुसार हा निधी ग्रामपंचायतींना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. त्यामुळे आता अबंधितच्या कामांना वेग येणार आहे. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू असल्याने त्या वेळी तिथे प्रशासक होते.
त्यामुळे बंधितचा हप्ता ‘त्या’ ग्रामपंचायतींचा थांबवण्यात आला होता; मात्र आता निवडणुका संपल्यानंतर संबंधित ठिकाणी नवीन पदाधिकारी आले आहेत. त्यामुळे शासनाने मागील बंधितचा ४ कोटी ५७ लाख आणि कालचा अबंधितचा ३ कोटी ५ लाखांचा निधी ग्रामपंचायतींना वर्ग करण्याच्या हालचालींना वेग दिला आहे.