राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ‘कृषी समृद्धी’ योजना जाहीर केली आहे. ज्यामध्ये दरवर्षी ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. या योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला ७४ कोटींचा निधी मिळणार आहे. त्यापैकी १७ कोटी ६८ लाख निधीला मंजुरी मिळाली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्याला कोट्यवधींचा निधी प्राप्त होणार आहे. कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे आणि पिकांमध्ये विविधता आणणे, या उद्देशाने कृषी समृद्धी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत आर्थिक वर्षात दरवर्षी ५ हजार कोटींचा निधी मिळणार असून, पाच वर्षांत २५ हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनांसाठी मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्याला यातील निधी मिळाल्यानंतर प्रत्येक कृषी सजातील सहायक कृषी अधिकारी यांना जवळपास ५० लाखांचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनांसाठी दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर या योजनेची माहिती मिळणार आहे. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, त्यामध्ये ब्रशकटर, पॉवरटिलर, ट्रॅक्टर, फवारणी पंप मिळणार आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना या योजनांचा समावेश या योजनेत असणार आहे.