गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात आली. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांत ७६ वानर, माकडे हरचिरी-उमरे भागात पकडण्यात आली. आत्तापर्यंत १४६ वानर-माकडे पकडली आहेत. सुमारे दोन महिने ही मोहीम गावागावातून सुरू राहणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना, शेतकरी यांना दिलासा मिळणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावात या संदर्भात मोर्चे, आंदोलन व निवेदन देण्यास सुरवात झाली. त्यानंतर वनविभागाने माकडे पकण्याची मोहीम सुरू केली. सगळ्या गावातून वानर, माकड नक्की पकडले जातील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. समाधानगिरी यांची एक टीम माकडे पकडत आहे. गेल्या दोन दिवसात वनविभागाने राबवलेल्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल; पण उपद्रवी पशू घोषित होऊन त्यांना शेतीमध्ये आली तर मारा, अशी परवानगी मिळेपर्यंत हा लढा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने सुरू राहील, असे अविनाश काळे यांनी सांगितले.
गावोगावी बैठका – दरम्यान, वानर, माकडे पकडण्याबाबत वनविभागाने गावोगावी ग्रामस्थांसोबत बैठका सुरू केल्या आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधून त्या परिसरातील वानर, माकडे पकडण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. याबाबत सोमवारी काजरघाटी येथेही ग्रामस्थांसोबत बैठक झाली.