शहराला नैसर्गिक रित्या पाणीपुरवठा करणाया कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूला नवीन पर्यायी धरणाच्या रखडलेल्या कामांसाठी शासनाकडून ८ ‘कोटी १८ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. तशी माहिती माजी आमदार अॅड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी दिली. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी मंजूरीचा अध्यादेश काढण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. राज्याच्या नगरविकास विभागाकडून हा अध्यादेश काढण्यात आला आहे. गुरूवारी मुंबईत विधिमंडळात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोन्हे यांच्या दालनात झालेल्या विनंती अर्ज समितीच्या बैठकीत यावर निर्णय होऊन या कामासाठी निधी मंजूरीच्या अध्यादेशाची प्रत उपसभापती डॉ. निलम गोन्हे यांनी आपल्याकडे सुपूर्द केल्याचेही सौ. खलिफे यांनी सांगितले.
शासनाच्या वतीने राज्यातील लहान नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानातून राजापूर नगरपरिषदेसाठी शहर पाणीपुरवठा नविन धरणाचे (कोदवली सायबाचे धरण) उर्वरीत बांधकाम करणे या कामासाठी रक्कम रु.८,१८,००,०००/- (अक्षरी रक्कम रु. आठ कोटी अठरा लक्ष मात्र) इतका निधी. सदर कामाकरीता मंजूर करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी डॉ. निलम गोऱ्ह यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, राज्याचे मंत्री ना. शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अमिन पटेल, आमदार भाई जगताप यांसह प्रशासनाने मोलाचे सहकार्य केल्याने हा निधी मंजूर झाल्याचे सौ. खलिफे यांनी सांगितले.
राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या धरणाच्या कामासाठी प्रारंभी दहा कोटीचा निधी मंजूर केला होता. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काम वाढल्याने हा निधी अपुरा पडल्याने काम अपूर्णावस्थेत राहिले. त्यामुळे या उर्वरित कामासाठी निधी मिळावा असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. मी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. सन २०२३ मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आमदार पृथ्वीराज चव्हाण व अमिन पटेल यांनी तर विधानपरिषदेत आ. भाई जगताप यांनी लक्षवेधीद्वारे या धरणाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले होते.
यावर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते असे माजी आ. हुस्नबानू खलिफे यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान अनेक वर्षे अर्धवट अवस्थेन रखडलेल्या राजापुरातील कोदवली येथील नवीन पर्यायी धरणाच्या कामाला सौ. खलिफे यांनी गती देत ते पूर्णत्वाला नेण्यासाठी व यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे राजापूकरांकडून कौतुक होत असून शहरवासीयांनी सौ. खलिफे यांचे अभिनंदन केले आहे.