जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि कमी मनुष्यबळाचा गंभीर प्रश्न लवकरच सुटणार आहे. पुढच्या आठवड्यात एमबीबीएस झालेले ८५ डॉक्टर्स वर्षाच्या इंटर्नशिपसाठी जिल्हा रुग्णालयाला मिळणार आहेत. त्यामुळे आरोग्यसेवेत गुणात्मक वाढ होणार आहे. रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. या डॉक्टरांना रुग्णांना कसा धीर द्यावा, नातेवाईक, लोकप्रतिनिधी आदींशी कसे वागावे याची कार्यशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद घेणार आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालय हे सर्वसामान्यांचे रुग्णालय आहे. जिल्ह्याच्या टोकावरून म्हणजे अगदी मंडणगडपासून सामान्य रुग्ण उपचारासाठी येतात. दिवसाला सुमारे चारशे ते पाचशे बाह्यरुग्णांची तपासणी होते.
तीच साथीच्यावेळी जवळपास ८०० पर्यंत जाते; परंतु वर्षानुवर्षे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न काही सुटलेला नाही. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे असल्याने २१ पैकी दोन ते चार अधिकाऱ्यांना जिल्हा रुग्णालयाचा डोलारा सांभाळावा लागतो. यामुळे कार्यरत असलेले डॉक्टर तणावाखाली येतात आणि राजीनामा देऊन जातात. भूलतज्ज्ञांचा प्रश्नदेखील तसाच आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये भूलतज्ज्ञ नसल्याने अनेक शस्त्रक्रिया खोळंबल्या होत्या. त्याला आता पर्याय म्हणून खासगी भूलतज्ज्ञांना बोलावण्यात येते; परंतु ते देखील त्यांच्या सोयीने. रुग्णांची हेळसांड होते.
म्हणून सेवेकडे दाखवतात बोट – जिल्हा रुग्णालयात सुसज्ज असे अत्याधुनिक विभाग आहेत; परंतु कमी आहे ती मनुष्यबळाची. कमी मनुष्यबळामुळेच जिल्हा रुग्णालयाच्या सेवेकडे बोट दाखवले जाते; परंतु पुढच्या आठवड्यात मनुष्यबळाची मोठी समस्या सुटणार आहे. एमबीबीएस पूर्ण केलेले ८५ डॉक्टर्स एका वर्षाच्या इंटर्नशिपसाठी जिल्हा रुग्णालयाला मिळणार आहेत.
सुरक्षा होणार मजबूत – जिल्हा रुग्णालयासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत होणार आहे. १२० सुरक्षारक्षकांची भरती येत्या काही दिवसांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णालय आणि रुग्ण अधिक सुरक्षित असणार आहेत. जिल्हा रुग्णालयातील नातेवाइकांना थांबण्यासाठी असलेली व्यवस्थालवकरच सुरू केली जाणार असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्याचा विचार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांनी दिली.