रत्नागिरीतील समुद्र किनार्यालगतच्या भागामध्ये तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम अधिक प्रमाणात जाणवला आहे. कोकण किनारपट्टी म्हणजे नारळ पोफळीची उंचच उंच झाडे, आंब्यांनी भरलेले संपूर्ण झाड, काजूची लाल,पिवळी, केशरी बोंडे, त्यांना लटकलेल्या बिया हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्या बरोबरच रत्नागिरीतील रानमेवा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. या हंगामात जांभळ, करवंद, ओले काजूगर, विलायती काजू, बोर, कोकम, चिंचा, पेरू, रातांबे, तोरणं, वेगवेगळ्या प्रजातीचे आंबे, आंब्याची फणसाची साठे, फणसाचे भाजीचे गरे, तसेच कापा, बरका परिपक्व फणसाचे गरे असे एक ना अनेक प्रकार या हंगामात ग्रामीण भागातून बाजारपेठेमध्ये महिला विकायला आणतात.
परंतु या वर्षी एक तर कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि नुकतेच येऊन गेलेले तौक्ते वादळ त्यामुळे सर्व झाडांची वाताहात झाली. रत्नागिरीतील ग्रामीण भागामध्ये माळरानावर मोठ्या प्रमाणात या सर्व रानमेव्यांचा साठा मिळतो. पावसाळ्याला सुरुवात व्हायच्या आधी ग्रामीण भागातील महिला या सगळ्याचा रोज फ्रेश साठा करून शहरी भागामध्ये विकायला आणतात. त्यांमुळे गावाकडचा रानमेवा शहरी भागातील लोकांना सुद्धा चाखायला मिळतो. आणि त्या महिलांना सुद्धा काहीतरी उत्पन्न मिळते. पण एकदा पाऊस सुरु झाला कि या फळांमध्ये किडी सदृश्य प्राणी निर्माण होतात आणि चवी मध्येही काही प्रमाणात फरक जाणवतो. त्यामुळे जास्तीत जास्त मे च्या अखेरीपर्यंत असा रानमेवा बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतो.
या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान तसेच वातावरणामध्ये घडून आलेला बदल आणि शासनाने कोरोना संसर्गामुळे केलेले लॉकडाउन, त्यामुळे या रानमेव्याला शहरी भागातील लोकांना मुकावे लागत आहे. आणि ग्रामीण भागातील बऱ्याच कुटुंबांचे रोजगाराचे साधन ही त्यामुळे बंद झाले.