रत्नागिरीतील माणसे आपण भल नी आपलं काम भल या तत्वाची. मागील साधारण सव्वा वर्षापासून कोरोनाच्या संक्रमणामुळे जिल्ह्यामध्ये संचारबंदी कमी अधिक प्रमाणामध्ये सुरु आहे. ३१ मे पर्यंत असणारी संचारबंदी वाढवून अजून ७ दिवस कडक संचारबंदी जिल्हा प्रशासनाने लावली गेली, व्यापारी वर्गाने याविरोधात आवाज उठविला, कारण गेले एक वर्ष सगळेच उद्योग धंदे बंद असल्याने कमावणार काय आणि कुटुंबाला खायला घालणार काय! अशी अवस्था निर्माण झाली आहे. अनेक लहान मोठ्या व्यवसायीकांना या कोरोनामुळे फटका बसला आहे.
जिल्हा प्रशासनाने २ जून रात्री १२ ते ९ जुन रात्री १२ वाजेपर्यंत सात दिवसांचे कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांचे सुद्धा आदेश होते कि, जनतेला विश्वासात घेऊन, पूर्वसूचना देऊन लॉकडाऊन जाहीर करा. परंतु, खरच जनतेला घेतले गेले का विश्वासात ! परंतु, तरीही रत्नागिरीची जनता हा सुद्धा नियम अमलात आणत आहे. व्यापारी वर्गाने अर्धवट लॉकडाऊन नको, करायचे तर सर्वच बंद करा, आणि पुर्वनियोजनासाठी एक दिवसाची वाढीव मुदत प्रशासनाकडून मागून घेतली.
सध्या जगभरात घडणाऱ्या बातम्या समजण्यासाठी टीव्ही आणि सोशल मिडिया कायम सक्रीय आहे. काही शासकीय जीआर हे फक्त काहीच माध्यमांपर्यंत पोहोचत असून, जनता मात्र त्यापासून अनभिज्ञचं आहे. बँक आणि पतसंस्था या कडक लॉकडाऊन मध्ये फक्त शेती विषयक कामांसाठी सुरु ठेवण्यात येणार होत्या, परंतु त्यामध्ये त्यामध्ये काल दुरुस्ती करून ११ ते २ या वेळेमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा व्यवहार सुरु राहतील असे नमूद केले गेले आहे. अर्थात अशा प्रकारच्या गैरसोई विविध ठिकाणी पाहायला मिळतात पण रत्नागिरीतील माणसे अति संयमी असल्याने कडक लॉकडाऊन १००% यशस्वी झाले म्हणायला हरकत नाही.