रत्नागिरीत सध्या जोरदार पाऊस कोसळतोय. त्यामुळे चिपळूणमध्ये एनडीआरएफचे पथक कालपासूनच दाखल झाले आहे. गेल्या वर्षी चिपळूणमधील पुरपरिस्थिती लक्षात घेता यावर्षी आधीच एनडीआरएफची एक टिम दाखल झाली. गेल्या वर्षी एनडीआरएफ टीम दाखल होण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे टिम चिपळूणमध्ये उशीरा दाखल झाली होती मात्र यावर्षी ही खबरदारी प्रशासनानं आधीच घेतली. पाऊस संपेपर्यंत ही टिम चिपळूणमध्येच असणार आहे.
आज या टिमने अनेक ठिकाणची पाहणी केली. ज्या भागात पुर येऊ शकतो, ज्या भागात दरड कोसळू शकते अशा भागात जाऊन पाहणी केली गेली. दरम्यान धरणाचे पाणी सोडण्यात येणार नाही. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. नगरपालीकेने पूर्वतयारीमध्येच आपत्कालीन कक्ष सुरु केला आहे. त्या ठिकाणी संपर्क करावा असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.
गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. तालुक्याच्या पुर्व भागात जोरदार पाऊस झाल्याने मंगळवारी सायंकाळी अर्जुना नदीला पूर आला. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत वेगाने शिरू लागले. मात्र सायंकाळ नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री ९ वाजण्याच्या दरम्यान जवाहरचौक बाजारपेठ परिरातील पूर ओसरला. मात्र मंगळवारी सकाळपासून पुन्हा एकदा संततधार पर्जन्यवृष्टीमुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला. पुराच्या पाण्याने जवाहरचौकाला वेढा दिला आहे.
तर पुरस्थितीमुळे राजापूर शहरातील शळा महाविद्यालये सोडून देण्यात आली. तर जवाहरचौकाकडे येणारी एसटी वाहतुक बंद करण्यात आली. पूरस्थितीमुळे शिवाजीपथ व चिंचबांध रस्ता पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी शहर बाजारपेठेत शिरण्याच्या शक्यतेने राजापूर नगर परिषदेने नागरिक व व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.