टोरंटो येथील रहिवासी असलेल्या लीना मणिमेकलाई यांनी काली या माहितीपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. या माहितीपटाच्या प्रसिद्ध झालेल्या पोस्टर वरून हिंदू देवतांचा अपमान होण्यावरून जो वाद निर्माण झाला आहे, त्यावर लीना यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी आपण जे काही केलं आहे, ते योग्यच असल्याचं ठामपणे सांगितलं आहे.
सोशल मीडियावर ‘काली’ माहितीपटाचे पोस्टर शेअर झाल्यानंतर हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘अरेस्ट लीना मणिमेकलाई’ हा हॅशटॅग देखील ट्रेंडमध्ये आला आहे. कॅनडामधील भारतीय दूतावासानं देखील त्यानंतर तातडीनं याची गंभीर देखल घेतली आहे. ‘अंडर द टेंट’ प्रोजेक्ट अंतर्गंत “काली” हा माहितीपट टोरँटोमधल्या आगा खान म्युझियममध्ये दाखवण्यात आला होता. त्यानंतर भारतीय दूतावासानं सामाजिक भावना भडकावणारा मजूकर माहितीपटातून हटवण्याची मागणी केली आहे.
भारतीय दूतावासानं प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, कॅनडामध्ये काली हा माहितीपट दाखवल्यानं त्याच्या विरोधात हिंदू धर्मियांच्या नेत्यांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. या माहितीपटाच्या पोस्टरमुळे हिंदू देवतांचा अपमान झाल्याचं त्यांनी सांगितलं.
या प्रसिद्धीपत्रकात असंही म्हटलं आहे की, अनेक हिंदू समुदाय आमच्याकडे आले आणि त्यांनी आयोजकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे माहितीपटाच्या दिग्दर्शिका लीना यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. ट्वीट करत लीना यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही. जे लोक बेधडकपणे, निडरपणे बोलतात त्यांच्यासाठीच मी कायम आवाज उठवीन. जर त्यासाठी माझं आयुष्य जरी द्यावं लागलं तरी मी देईन ‘ लीना यांनी स्पष्टपणे सांगितल आहे.