संपूर्ण राज्यातून पंढरपूर आषाढी वारीसाठी मोठ्या प्रमाणावर वारकरी दर्शनासाठी येत असतात. जसा कोकणातील गणेशोत्सव तसाच पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी येणाऱ्या या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष सवलत दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. या टोलमाफी सुविधेचा वारकऱ्यांना लाभ होण्यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले की, आषाढी वारीसाठी जाणाऱ्या भक्तांना टोलमाफी करण्यात आल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री आणि महत्त्वाच्या व्यक्तींपेक्षा वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी, ऊन-पावसाची तमा न बाळगता ते मैलोनमैल पायी प्रवास करत आहेत असे मत मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केले आहे.
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला प्रत्यक्ष जाता आले नाही. त्यामुळे यंदा वारकरी मोठ्या उत्साहात वारीमध्ये सहभागी होऊन याची देही याची डोळा पांडुरंगाचे दर्शन घ्यायला अधीर झाले आहेत. याच अनुषंगाने आषाढीला पंढरपुरात मोठी गर्दी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अशा स्थितीत योग्य आणि आवश्यक तसे नियोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. स्वच्छता, आरोग्य, टॉयलेट, रस्ते सफाई, वाहतूक व्यवस्था, औषधे, साफसफाई, या मुलभूत सुविधांची व्यवस्था चांगली झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य रस्ते महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ निर्देश देण्याबाबतही त्यांनी सांगितले.