महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचा गटच पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाचा खरा दावेदार असल्याचे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आम गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत धनुष्यबाण हे शिवसेनेचे आहे आणि सेनेचेच राहणार अशी स्पष्ट भूमिका व्यक्त केली. हिंदूत्वावादी म्हणवून घेणाऱ्या ४० जणांनी आपली आधी भूमिका स्पष्ट करावी. जी पुन्हा उभी राहणार आहे ती खरी शिवसेना. मातोश्री माझी, शिवसेना माझी असं म्हणणाऱ्यांनी स्वतः सर्व निर्माण करावे, कोणीही आले आणि गेले तरी शिवसेना अजूनही भक्कम आहे.
याउलट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे कि, नव्या चिन्हाची तयारी ठेवा’ असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं आहे. ते पाहता पक्षाचे धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे जे काही नवे निवडणूक चिन्ह येईल ते स्वीकारून लवकरात लवकर त्याची पूर्वतयारी करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्याचे समजते आहे. पुढे बोलताना ते म्हणाले कि, माझी प्रकृती आत्ता ठीक असल्याने, आता आम्ही शिवसेना भवनात दररोज उपलब्ध असणार आहोत, असे सांगत त्यांनी विरोधकांशी दोन हात करण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.
कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी शिवसैनिकांनी गाफील न राहाता शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं आहे. ११ जुलैला १६ बंडखोर आमदारांच्या अपात्रेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता देखील येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे.