राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक रंगतदार राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडी बंडखोर आमदारांमुळे पायउतार झाली तर शिंदे गटाचे नाट्यमयरित्या सत्तापालट झाले तर दुसरीकडे अमित ठाकरे सक्रिय झालेले पाहायला मिळत आहेत. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटना वाढीवर भर देण्याचे ठरवले असून त्यांनी सुरुवात कोकणापासून महासंपर्क अभियानाला केली आहे.
नुकतेच रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी रत्नागिरीमधील विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती कक्षाला भेट दिली. याबाबत अमित ठाकरे फेसबुकवर पोस्ट करत म्हणाले की, रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात भेटायला आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. अमेय पोतदार यांच्या आग्रहास्तव रत्नागिरी विशेष कारागृहात गेलो. तिथल्या सावरकर स्मृती कक्षात गेल्यानंतर, त्या कोठडीचा इतिहास जाणून घेतल्यानंतर शहारून गेलो, असं अमित ठाकरे म्हणाले.
पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे ‘मनसे पुनर्बांधणी महासंपर्क अभियान’ राबवत असून ते कोकण दौऱ्यावर आहेत. आज अमित ठाकरे यांनी रत्नागिरीमधील विशेष कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती कक्षाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अंदमानला काळया पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी १९२१ ते १९२३ अशी दोन वर्षं ज्या तुरुंगाच्या अंधाऱ्या खोलीत दंडा-बेडी लावून डांबून ठेवलं होतं, त्याच जागी काही मिनिटं मी उभा राहिलो होतो. कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्यांनी या कारागृहातल्या सावरकर स्मृती कक्षाला अवश्य भेट द्यावी. इथे आपला इतिहास आहे. जुलुमाविरोधात लढण्याचं महाप्रचंड बळ देणारी प्रेरणा इथे मिळते. त्या प्रेरणेचं नाव म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, असं अमित ठाकरेंनी नतमस्तक होऊन म्हटल.