रायगड लोकसभा मतदार संघातून अनंत गीते २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिवसेनेचा एकमेव मंत्री म्हणून काम करण्याची संधी गीते यांना मिळाली होती. केंद्रीय अवजड उद्योगखात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले; मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणापासून दूरच झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
चिपळूण येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात बोलताना त्यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव मुद्दाम घेत आहे. त्यांनाच इशारा देतोय, फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचे पाप तुम्ही करू नका. चिपळूण येथील निर्धार मेळाव्यात त्यांनी बंडखोरांचा समाचार घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले. गीतेंनी थेट पंतप्रधान मोदींनाच इशारा दिल्यानंतर, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
राजकारणापासून फारकत घेतल्यापासून गीते शिवसेनेच्या जाहीर कार्यक्रमातही दिसत नव्हते; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनंत गीते पुन्हा सक्रिय झाले. त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीका करण्याऐवजी थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांनाच लक्ष्य करून त्यांना सूचक इशाराच दिला आहे. अत्यंत आक्रमकपणे ते भाजपविरोधी भाषण करत असल्यामुळे बंडखोरीनंतर गीते कमालीचे संतप्त झाल्याचे दिसून आलेत. आणि शिवसेनेशी बंड केलेल्यांना भविष्यात समजेल कि, केवढी मोठी चूक आपण केली आहे, परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. असे त्यांनी भाषणात म्हटले.