रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी जेंव्हा राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये एन्ट्री घेतली तेंव्हा खासदार राऊत यांच्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीपासून हे दोघे कायम एकत्रच दिसून आले होते. शिवसेनेचे खासदार असलेले विनायक राऊत यांचे ‘मातोश्री’ शी जवळचे संबंध होते. त्यांनी नेहमीच आमदार सामंत यांना झुकते माप देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सामंत यांना फडणवीस सरकारमध्ये म्हाडाच्या अध्यक्षपदी बसवण्यापासून ते ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात राऊत यांची महत्वाची भूमिका होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे अनेक निर्णय दोघे एकमेकांच्या सल्ल्याने घेत होते. त्यामुळे शिवसेनेतील दुसरा गटाची नाराजगी कायम स्पष्ट दिसत होती. नाराज गटाने खासदार राऊत यांच्या विरोधात अनेक कामी करण्याचाही प्रयत्न केला; परंतु सामंत आणि राऊत यांच्या मैत्रीमध्ये कधीही वेबनाव आले नाहीत; बल्की यांची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत गेली.
परंतु, इतकी वर्ष शिवसेनेमध्ये काढून, शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी केल्यापासून दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर आमदार सामंत शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर राऊत आणि सामंत यांच्यातील खुले राजकीय युद्ध सुरू झाले. रत्नागिरी येथे शिवसेनेचा मेळावा घेऊन खासदार राऊत यांनी आमदार सामंत यांच्यावर जोरदार टीका केली. ‘शिवसेनेने सर्वकाही देऊन सुद्धा तुम्ही बंडखोरी केली. शिवसेना संपवण्यात भागीदार झाल्यास तुमची जागा नरकात असेल,’ असे सांगत आमदार सामंत यांना खासदार राऊत यांनी गद्दार ठरवले. त्यानंतर सामंत यांनी पत्रातून राऊत यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दोघांमधील वाद आता विकोपाला गेला आहे.
दरम्यान, सामंत यांनी सांगितले कि, मी राऊत साहेबांच्या टीकेवर काहीही प्रतिक्रिया देणार नाही. पण मी कालही शिवसेनेत होतो, आजही आहे आणि बंडखोरी का केली, हे भविष्यात स्पष्ट होईल, असे सामंत यांनी सांगितले.