रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये दाखल असलेले अनेक रुग्ण आत्ता बरे झाले असून, मानसिक आणि शारीरिक ते निरोगी झाले असून आपली नातेवाईकांच्या वाटेवर डोळे लावून बसले आहेत. परंतु, अनेक जणांनी दिलेल्या संपर्क क्रमांकामध्ये काही ना काही त्रूटी आढळून येत असल्याने बरे झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना संपर्क करणे कठीण बनले आहे.
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांच्या पुनर्वसनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एकूण २०० रूग्णांपैकी २० रूग्ण बरे झाले आहेत. मात्र त्यांचे नातेवाईकच त्यांना न्यायला येत नसल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा भीषण प्रश्न उभा राहिला आहे. नातेवाईकांचा शोध सुरू असला तरी या रूग्णाना पोरकेपणाची भावना खात आहे. कोणीतरी आपल्याला न्यायला येईल, आपले हक्काचे घर मिळेल, या एकच भावनेपोटी ते नातेवाईकांची वाट बघत आहेत.
रत्नागिरी प्रादेशिक रूग्णालय हे सांगली, कोल्हापूर, मिरज, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये रूग्णालयात रूग्णांची संख्या बेताची होती, मात्र आता कोरोनानंतर सर्व निर्बंध उठल्यावर मनोरूग्ण दाखल करण्याची संख्येत वाढ होत चालली आहे. रूग्णालयात सध्या २०० मनोरूग्ण दाखल आहेत. त्यांच्या वर योग्य पद्धतीने उपचार सुरू असून अधिकारी, कर्मचार्यांकडून योग्य निगा आणि काळजी राखली जात आहे. मात्र असे बरेचदा नजरेस आले आहे कि, अनेक नातेवाईक रूग्णांना दाखल तर करतात आणि संपर्काचे खोटे पत्ते देवून जातात. रुग्ण उपचारानंतर बरा झाला तरी तो पुन्हा आपल्या कुटुंबात जाण्याचा मार्ग खडतर होतो, अशी अनेक उदाहरणे समोर असल्याचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाली.