शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. विरोधी पक्षावर कायम बेधडक टीका करणारे म्हणून त्यांची ख्याती आहे. नुकतीच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा अन्वये न्यायालयाने त्यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. तर ईडीने राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही पत्राचाळ प्रकरणी समन्स बजावलं आहे. त्यानंतर आता ईडीला राऊतांच्या घरातून जप्त केलेल्या एका डायरीमध्ये काही कोडवर्ड्स स्वरूपात नोंदी आढळल्या असल्याचे बोलले जात आहे. हे कोडवर्ड म्हणजे ज्या लोकांना पैसे दिले त्यांची नावं असल्याचा दावा ईडीने केला आहे. त्यामुळे आता राऊतांचे अजून खोलात जाऊन चौकशी करण्यात येण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांच्याविरोधातील पुरावे त्यांच्याच घरातून सापडले, असा दावा ईडीने कोर्टात केला. संजय राऊतांच्या घरातून एक डायरी ईडी अधिकाऱ्यांना मिळाली असून ही डायरी राऊतांच्या रुममध्ये होती. या डायरीत कोडवर्डमध्ये १ कोटी १७ लाख रुपये पैसे दिले गेले असा उल्लेख करण्यात आला आहे. हे लोक कोण आहेत, एवढी मोठी रक्कम कुणाला दिली याबाबत संजय राऊत आणि त्यांच्या निकटवर्तीयांना प्रश्न विचारला असता त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.
त्यामुळे ईडीने रिमांडमध्ये सुद्धा १ कोटी १७ लाख रुपये मिळवण्याचा उल्लेख रिपोर्टमध्ये केला होता. तर त्यांची नावे कुणाला कळू नये यासाठी ते कोडींग भाषेत लिहिण्यात आले का, असा ईडीला संशय आहे. ईडीने ही कागदपत्रे जप्त केली असून या डायरीच्या मध्यमातून ईडी संबंधित लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.