कोरोनाचे नियम शिथिल झाल्यावर दोन वर्षानी यंदा मोठ्या उत्साहात दहिहंडी उत्सव २०२२ स्पर्धेचे आयोजन केले आहे. लहान शहरापासून ते मोठ्या शहरांपर्यंत सगळीकडेच दहीहंडीची तयारी जोशात सुरु झाली आहे. रत्नागिरी तालुका व शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व नियमांचे पालन करीत गोविंदाच्या सुरक्षेची काळजी घेवून शहरातील आठवडा बाजार येथे सायंकाळी पाच ते रात्री दहा या वेळेत ही स्पर्धा होईल. याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयस्तंभ येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यावेळी तालुका युवक अध्यक्ष सिद्धेश शिवलकर, संकेत कदम, मंदार नैकर आदी उपस्थित होते.
जास्तीत जास्त थर लावणार्या गोविंदा पथकाला ११ हजार १११ रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. यावेळी रत्नागिरी व मुंबईतील नावलौकीक कलाकार द सेजल डान्स यांच्यामार्फत नृत्याविष्कार साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे रत्नागिरी तालुका कार्याध्यक्ष मनू गुरव यांनी दिली.
जिल्ह्यातील दापोलीमधील गोविंदा पथके सज्ज झाली असून काही पथकांमार्फत सराव सुरू आहे. मुंबई पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही दहीहंडीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. सात ते आठ थर असणार्या हंड्या फोडण्यासाठी जिल्ह्यातील पथकांसह जिल्ह्याबाहेरची पथकेही दाखल होतात. सध्या दहीहंड्यांच्या थरांबरोबर ठेवण्यात आलेल्या बक्षिसांच्या किमतीतही थरांप्रमाणे वाढीव रकमेची स्पर्धा असल्याने सध्या दहीहंडीला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे. परंतु, तरी देखील अनेक हौशी गोविंदा आपली हौस पूरी करण्याकरिता विविध पथकांमध्ये सामील होतात आणि दहीहंडीचा आनंद मनमुराद लुटतात. त्यामुळे दोन वर्षांनी साजरा करायला मिळणारा दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार असल्याचे दिसून येत आहे.