यावर्षी गणेशोत्सवात कोकणवासीयांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे प्रवास वेळेत झाला. तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकणात येण्यासाठी ३५० मोफत एसटी बसेस दिल्या हे पहिल्यांदाच घडले आहे, असे रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंना जमल नाही, ते या सरकारने करून दाखवले अशी टीका रामदास कदमांनी केली आहे.
आपलं सरकार राज्यात आल्याची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली असून कोकणवासियांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी कुठलाही त्रास झाला नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख काम बजावलं आहे. शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मिळून अनेक चांगले निर्णय घेतले असून त्यामध्ये शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान, पोलिसांना १५ लाखांत घरे हे निर्णय घेतले. मागच्या काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांना जमलं नाही ते या सरकारने करून दाखवले, अशा शब्दात कदमांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले.
कदम पुढे बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री कसा असावा हे शिंदेंनी दाखवून दिले आहे. आता शिंदे आणि फडणवीस हे दोघंही अनुभवी नेते असल्याने एक से भले दो.. अस झाल्याने राज्याच्या विकासाचा गाडा पुढे नेत आहेत. हा मुख्यमंत्री आमचा आहे, अशी भावनाही लोकांच्या मनात निर्माण झाली असून मी कोकणवासियांच्या वतीने मुख्यमंत्री शिंदें आणि फडणवीसांचे आभार मानतो.
मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांनी असं करणं हे पहिल्यांदाच घडलेल बघायला मिळालं आहे. जो स्वत:साठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो जगला असे काम शिंदेंचे सुरू असून ते राज्यात चांगले निर्णय घेत आहेत. त्यासाठी दिवसरात्र काम करतात आहेत. मंत्रालयात भेटतात, वेळ देतात, यावेळी उद्धव ठाकरेंवर नाव न घेता कदम यांनी जोरदार टीका केली आहे. याआधीचे मुख्यमंत्री फक्त तीनदा मंत्रालयात आले, त्याची गिनीज बुकमध्ये नोंद करा असं कदम म्हणाले मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं असंही कदम म्हणाले.