रत्नागिरी तालुक्यात २००४-०५ दरम्यान पंचतारांकित एमआयडीसी मंजूर झाली होती; मात्र, विरोधानंतर ती तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे म्हणजेच कागलला ता. कोल्हापूर नेण्यात झाली. आज तेथील ८० ते ९० हजारांहून अधिक लोकांना रोजगार मिळाला असून, रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणांना मात्र बेरोजगारीमुळे इतरत्र विस्थापित व्हावे लागते. या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आता उद्योगमंत्री या नात्याने रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकित आणणे काळाची गरज आहे.
जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीमुळे नोकरी आणि व्यवसायासाठी जिल्ह्याबाहेर विस्थापित व्हावे लागत असल्याने आता उद्योगमंत्री या नात्याने रत्नागिरी तालुक्यात पंचतारांकित एमआयडीसी आणावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर यांनी सांगितले.
आज तुमच्याकडे उद्योगमंत्रीपद आहे. त्या माध्यमातून रत्नागिरी विधानसभा मतदार संघात पंचतारांकित एमआयडीसी मंजूर करावी जेणेकरून अनेक स्थानिक तरुणांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न सुटतील. लोकांना स्वतःच्या शहरामध्ये राहून नोकरी, व्यवसाय करण्याची संधी प्राप्त होईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेवेळी राष्ट्रवादीचे नीलेश भोसले उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘प्रदूषणविरहित उद्योग व कारखाने यावेत, यासाठी आणि रोजगार मिळण्यासाठी स्थानिकांकडून आग्रह धरला जात आहे. गेली अठरा वर्षे सामंत हे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वीही विविध मंत्रिपदे भूषवली आहेत. सत्तेत असतानाही त्या-त्या वेळच्या उद्योगमंत्र्यांकडून एखादा उद्योग रत्नागिरी तालुक्यात त्यांनी आणणे अपेक्षित होते; परंतु त्यांना तसे प्रत्यक्षात झाले नाही.