गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर मुंबईकर चाकरमानी गावाहून परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री ९ वाजल्यानंतर राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड या स्थानकांवर प्रचंड गर्दी होती. या ठिकाणी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा आहे. तुतारी, पॅसेंजर, गणपती विशेष गाड्या सर्वच ठिकाणी थांबत असल्याने त्यांच्या वेळेत छोट्या-मोठ्या स्थानकांवर प्रवाशांनी ठाण मांडलेला होता.
मडगाव, तळकोकणातून गाड्या प्रवाशांनी भरून येत असल्याने डब्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी चढाओढ पाहायला मिळाली. आरक्षित डब्यांमध्येही मिळेल तिथे अगदी शौचालयाच्या दरवाजातही बसूनही अनेकजणं प्रवास करत होते. प्रत्येक स्थानकावर प्रवाशांमध्येच शाब्दिक खटके उडतच होते. त्यामुळे रेल्वे पोलिसांना प्रवाशांच्या मदतीसाठी हस्तक्षेप करावा लागत होता.
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांचा गौरी-गणपती विसर्जनानंतर परतीचा प्रवास सुरू झाल्याने ५ तारखेपासून कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे. सोमवारी रात्री कोकणकन्या, तुतारी, मत्स्यगंधा यांसह गणपती विशेष गाड्यांसाठी चाकरमान्यांनी स्थानकावर ठाण मांडले होते. यामध्ये कोकणकन्या आणि तुतारीला चाकरमान्यांची पहिली पसंती होती. या गाड्या आधीपासूनच भरून आल्यामुळे डब्यांमध्ये बसायला सोडाच पाय ठेवायला पण जागा नव्हती.
काही प्रवासी दरवाजाच्या पायऱ्यांवर बसून होते. डब्यात शिरण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागत होती. जनरल डब्यांमध्ये तर जागाच नव्हती. साहित्य ठेवण्याच्या जागांवरही प्रवासी जागा करून बसले होते. तिकिट आरक्षित असूनही प्रवाशांना जागा मिळत नव्हती. अशावेळी रेल्वे स्टेशनवर तैनात पोलिसांची मदत मोठ्या प्रमाणात झाली.
महिलांच्या राखीव डब्यांमध्येही प्रचंड गर्दी होती. अनेक ठिकाणी तर प्रवासी रेल्वे ट्राकवर उतरले. रत्नागिरी स्थानकात तर काही डबे प्रवाशांनी आतून बंद करून ठेवले होते. ते रेल्वे पोलिसांच्या मदतीने उघडायला लावण्यात आले. रत्नागिरी स्थानकात प्रवाशांमध्ये गाड्यांचे डबे वाढवा, अशी चर्चा सुरू होती. रेल्वे पोलिसांकडून गणपती फेस्टिव्हल गाड्यांतून प्रवास करा, असा सल्ला प्रवाशांना दिला जात होता. या गाड्यांमध्ये बसायला जागा उपलब्ध असते, अशाही सूचना दिल्या.