प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची आजच्या तरुण पिढीची तयारी असते. आणि त्याचा प्रत्यय गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील नागरिकांना आला आहे. गुहागरच्या शृंगारतळी बाजारपेठेत एकतर्फी प्रेमातून मन जडलेल्या महिलेला भेटण्यासाठी एक तरुण आला होता. आणि त्यावेळी कोणी ओळखू नये म्हणून त्याने चक्क बुरखा परिधान केला होता. परंतु, सतर्क नागरिकांच्या जागरुकतेमुळे हा प्रकार संबंधित तरुणाला चांगलाच महागात पडला. बुरखाधारी तरूणाचे हे कृत्य लक्षात आल्याने त्याचा प्लॅन फसला आणि थेट त्याची रवानगी पोलिसांच्या हाती करण्यात आली.
एका महिलेला भेटण्यासाठी वेष बदलून येण्याचा प्रयोग कोकणातील एका तरुणाला चांगलाच महागात पडला. हा तरुण चिपळूण शहराजवळचा असून तो बुरखा घालून का आला, याची चौकशी गुहागर पोलिसांनी केली असता प्रथमदर्शी एकतर्फी प्रेमातून एका महिलेला भेटण्यासाठी आल्याचे त्याने कबूल केले. शृंगारतळी बाजारपेठेत नेहमीच माणसांची आणि वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे कोणाचेच लक्ष नसते. त्यामुळे आपला डाव यशस्वी होईल, असा विचार करून चिपळूण तालुक्यातील एक तरुण एकतर्फी प्रेमातून, एका महिलेला भेटण्यासाठी शृंगारतळीत आला होता.
बाजारपेठेतून फिरत असताना एका मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाने त्याला बरोबर हेरले. त्याच्या भीतीने या तरुणाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र येथील नागरिकांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले. हा तरुण बुरखा घालून का आला, त्याचा हेतू काय? याची चौकशी पोलिसांनी केली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने एकतर्फी प्रेमातून भेटण्यासाठी आल्याचे कबूल केले. गुहागर पोलिसांनी या संशयित तरूणावर ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.