गुहागर तालुक्यात सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे रानवीच्या दिशेने जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल या एस.टी.ला शृंगारतळीकडे जाणाऱ्या धोपावे चिपळूण या एसटीने धडक दिली. २ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गुहागर तालुक्यात आरे नागदेवाडी येथे दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या या अपघातात २ चालकांसह ४१ प्रवासी जखमी झाले.
धोपावे चिपळूण एसटी बस संतोष उकार्डे चालवत होते. या गाडीत ३२ प्रवासी होते. तर श्रृंगारतळी अंजनवेल एसटीवर चालक म्हणून डी. एल. भोसले होते. या गाडीत १२ प्रवासी होते. अपघात घडला त्या ठिकाणी वळण आहे. सकाळी ९.२५ च्या दरम्यान पाऊस पडत असताना उकार्डे यांनी उतारावर असलेले वळणावर आपली एसटी चुकीच्या बाजूला नेली. त्याचवेळी रानवीकडे जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल एसटीवर ही उकार्डे यांची बस येवून आदळली. या धडकेमध्ये दोन्ही बसमधील प्रवासी समोरच्या सीटवर आदळले. त्यामुळे सर्व प्रवाशांच्या नाका, तोंडाला जखमा झाल्या आहेत.
अपघाताचे वृत्त कळताच आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वैद्यकीय सेवा पुरवण्यास सुरुवात केली. तसेच गंभीर जखमीं असणाऱ्या ज्यांना अधिक उपचाराची आवश्यकता असलेल्या १९ जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात गंभीर जखमी असलेल्या सुहासिनी सैतवडेकर या महिलेला जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. तातडीची मदत म्हणून अपघातग्रस्तांना एसटीने ५०० रुपयांची रोख मदत केली आहे.
अपघाताचे वृत्त आरजीपीपीएलच्या मेडिकल सेंटरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज इंजे यांना दुरध्वनीवरुन कळले. त्यानंतर डॉ. इंजेनी आपली रुग्णवाहिका अपघातस्थळी पाठवली. जखमींची संख्या जास्त असल्याचे लक्षात आल्यावर डॉ. इंजेनी कोकण एलएनजीचे अधिकारी रेड्डी यांना कळवले. रेड्डीनी त्यांची रुग्णवाहिकाही पाठवून दिली.