दापोली तालुक्यात मुरूड समुद्र किनारा सीआरझेड-३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्याने हा दावा दापोली कोर्टात दाखल केला आहे. साई रिसॉर्टचा आरोप असलेले शिवसेना नेते अनिल परब,साई रिसॉर्ट व सी काँच या तिघांविरुद्ध हा फौजदारी खटल्याचा दावा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात गेले वर्षभर केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करत हे रिसॉर्ट तोडावे व अनिल परब यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी वारंवार मागणी केली होती. त्याबाबत सतत पाठपुरावा देखील सुरु ठेवला होता. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळयांचे साई रिसॉर्ट हे हॉटेल तुटणार व सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनिल परब यांना दयावी लागतील असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
साई रिसॉर्ट तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. रिसॉर्ट तोडण्यासाठी चिपळूनच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर निविदा मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही रिसॉर्ट प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी दापोली कोर्टात १२ सप्टेंबर रोजी सोमवारी सुनावणी झाली. यावेळी दापोली कोर्टाने दापोली पोलिस निरीक्षकांनी याप्रकरणी चौकशी करून पुढील तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. अवघ्या राज्यात वादग्रस्त ठरलेल्या आणि विविध प्रकारच्या चर्चा रंगलेल्या अनिल परब यांच्यावर आरोप असलेल्या साई रिसॉर्ट व सी काँच रिसॉर्ट पडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु करण्यात आली आहे.