दापोली तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील नागरिकांच्या आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक नाहीत. त्यामुळे प्रत्येक गावात आधारकार्ड अपडेट करण्यासाठी शिबिर घेणे गरजेचे असले तरी प्रशासन व ग्रामपंचायतींकडून अशा प्रकारची शिबिरे घेतली जात नसल्याची खंत नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील ग्रामस्थांना आधार कार्ड अपडेटसाठी दापोलीत यावे लागते. दापोली शहरामध्ये बँक ऑफ इंडिया, सेतू पंचायत समिती कार्यालय येथे सध्या आधार अपडेट करण्याचे काम सुरू आहे; मात्र ग्रामीण भागातून सकाळी लवकर येऊन नंबर लावून देखील, सायंकाळपर्यंत काम न झाल्यामुळे परत जाऊन दुसऱ्या दिवशी यायला लागत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे नागरिकांना शासकीय कामांमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक कार्यालयांमध्ये देखील इंटरनेटचा स्पीड देखील नेमकच असल्याने एक कार्ड अपडेट व्हायला देखील बराच कालावधी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करत दापोली शहरात यावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शासनाकडून येणाऱ्या विविध योजनात्मक कामांसाठी लाभार्थ्यांचे आधारकार्डला मोबाईल क्रमांकाला लिंक असणे गरजेचे असल्याचे वारंवार सांगण्यात येत आणि ते नसेल तर आधी आधार क्रमांकाला मोबाइल क्रमांक अपडेट करावा लागतो. यासाठी नागरिकांना दापोली शहरातील आधार सेवा केंद्रात यावे लागते. सध्या ग्रामीण भागांमध्ये नेमक्याच बसफेऱ्या आहेत. खासगी वाहने, बसेस यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ शहरात येण्यास टाळाटाळ करतात. एकतर आर्थिक भार परवडणारा नसतो, त्यामुळे या कामाबद्दल नागरिक देखील चालढकल करताना दिसत आहेत.