जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या गुरांची समस्या नागरिकांसह वाहन चालकांची डोकेदुखी बनलेल्या आहेत. शहरातील मुख्य रस्त्यावरुन फिरणारी गुर अपघाताना कारणीभूत ठरत असतात. दिवसभर कळपाने फिरणारी गुरे रस्त्याच्या मधोमध येऊन घोळक्याने बसून राहतात, तर कधी इकडेतिकडे फिरताना दिसतात. अनेक वेळा काळोखातून प्रवास करताना ती दिसून न आल्याने अपघाताच्या घटना घडतात. आणि त्यांना चुकवून वाहन चालवण्याचे कसब चालकांना करावे लागते.
अनेक वेळा गुरांना शहराच्या बाहेर काढले जाते. पालिकेचे गुरे हाकलण्याचे पथक गेल्यानंतर तीच मोकाट गुरे पुन्हा ये रे माझ्या मागल्या च्या उक्तीप्रमाणे शहराच्या दिशेने येतात. या गुरांचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्याचे मोठे आव्हानच पालिकेपुढे उभे राहिले आहे. पालिकेतील सत्ताधार्यांची पाच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यामुळे प्रशासकांमार्फत कारभार चालवला जातो. त्यामुळे मुख्याधिकार्यांकडून याची गंभीर दखल कधी घेतली जाणार ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नगरपालिका प्रशासकांकडून मोकाट गुरांच्या मालकांवर फौजदारी कारवाई करू, असे सांगण्यात आले होते, परंतु, अद्याप तरी अशी काही कारवाई केल्याचे निदर्शनास आलेले नाही.
रत्नागिरीसह लोटे परिसरातील महामार्गावर मोकाट गुरांचा वावर मोठया प्रमाणात वाढला आहे. लोटे परिसरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी एकेरी मार्गाचे कॉंक्रिटीकरण झाले आहे. या मार्गावरील एक्सेल फाटा, आवाशी फाटा, पीर लोटे, पटवर्धन लोटे या हद्दीत रोज दिवस-रात्र १५-२० गुरांचे कळप बरोबर रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेले असतो. यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीमधून मालाची वाहतूक करणारी अवजड मालवाहू वाहने, प्रवासी वाहने जीव मुठीत धरून आपली वाहने हाकत आहेत.
कळंबस्ते, परशुराम घाटात अशीच परिस्थिती असते. एमआयडीसीचा परिसर ओलांडून गेल्यानंतर पुढच्या मार्गावरही मोकाट गुरे असतात. पूर्वी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा पालिका क्षेत्रात कोंडवाडय़ांची व्यवस्था होती. मात्र सध्या असे कोंडवाडे नाहीत. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांना ठेवायचे कुठे असा प्रश्न स्थानिक ग्रामपंचायतीसमोर निर्माण झाला आहे.