रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावरील सुरुबन धोक्यात आले आहे. दिवसेंदिवस समुद्र आतमध्ये घुसत असून येथील सुरुबनाची मोठी हानी घडत आहे. गावखडी मध्ये समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात वस्तीच्या भागात शिरत असल्यामुळे त्याचे संरक्षण करण्यासाठी गावखडी समुद्रकिनारी रत्नागिरी वन विभागाच्या माध्यमातून सागरी किनारी सुरुबन देखील तयार करण्यात आले. त्यामुळे वस्तीमध्ये घुसणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
अनेक पर्यटक या शांत समुद्र किनार्यावर फिरायला येत असतात. सर्वांसाठी हा आकर्षण ठरत आहे. परंतु दिवसेंदिवस समुद्राच्या भरतीच्या वेळामध्ये पाणी सुरूच्या झाडांमध्ये घुसल्यामुळे तेथील भाग दिवसेंदिवस समुद्र गिळंकृत करत चालला आहे. त्यामुळे सुरुबनाचा भाग कमी होत गेला आहे.
वन विभागाच्या दुर्लक्षपणामुळेच दिवसेंदिवस समुद्राचे पाणी भरतीच्या वेळी अजूनच आत आत मध्ये येण्यास सुरवात झाल्यामुळे भविष्यात सुरुबन समुद्र गिळंकृत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पंधरा ते वीस फूट आतमध्ये भरतीच्या पाण्याने अतिक्रमण केले आहे.
गावखडी येथील ग्रामस्थ प्रशांत फडके म्हणाले, दिवसेंदिवस समुद्र सुरुबनाचा भाग हडपत चालला आहे. त्या संदर्भात वन विभागाकडे वारंवार पाठपुरावा कऋण देखील त्याकडे लक्ष दिले जात नाही आहे. त्या परिसरात नव्याने लागवड करून परिसराचे संरक्षण करता येईल. मात्र याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजगी पसरली आहे. संपूर्ण सुरूबन समुद्राने गिळंकृत केल्यावर शासनाला जाग येणार का? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.
समुद्रावर फिणाऱ्या पर्यटकांना एखाद्या वेळी धोका निर्माण झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एक टॉवर बांधण्यात आला आहे. त्या जागेपर्यंत पूर्वी सुरुबनाची हद्द होती. मात्र हा टॉवर सध्या उघडा पडला असून, सुरुबनामध्ये पावसाळ्यामध्ये अनेक झाडे तुटलेल्या अवस्थेत आहेत, तर काही झाडे कोणत्याही क्षणी समुद्राच्या पाण्यात झेप घेतील अशा स्थितीत आहेत.