कोकणातील समुद्र किनाऱ्याचा अनेकवेळा दहशतवादी कारवायांसाठी वापर झाल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे सागरी सुरक्षेकडे शासनाने विशेष लक्ष केंद्रित केला आहे. तसेच केंद्र शासनाकडून विविध उपाय योजनाही केल्या जात आहेत. आता समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना क्युआर कोड पीव्हीसी आधारकार्ड अत्यावश्यक केले आहे. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
रत्नागिरीमध्ये खलाशी आणि मच्छीमारांचे आधारकार्ड क्युआर कोड तयार करण्यासाठी मत्स्य विभागाकडून नोंदणी सुरू झाली आहे. आतापर्यंत १४ हजार ५७ मच्छीमारांची नोंद झाली आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने शासनाच्या आदेशानुसार हे पाऊल उचलण्यात आले आहे. ११ ऑक्टोबरनंतर याची कडक तपासणी केली जाणार असल्याचे मत्स्य विभागाकडून सांस्पष्ट करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी परदेशातील एक नौका भरकटत अलिबागच्या किनारी आली होती, त्यामध्ये शस्त्र देखील आढळून आली होतीत. त्यामुळे त्यानंतर सुरक्षा यंत्रणाही तेवढीच सतर्क झाली होती. गेल्या काही वर्षांत असे प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशातील मच्छीमारी नौकांची नोंदणी, नौकांवरील खलाशांची नोंदणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. युनिक आयडेंटी म्हणून आधार कार्डाकडे पाहिले जाते. त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. त्याला जोड म्हणून आता क्युआरकोड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
अनेकवेळा दहशतवादी मच्छीमारी नौकांच्या सहाय्याने भारताच्या हद्दीत प्रवेश मिळवतात. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमीच्या समुद्र किनाऱ्यावर हजारो मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात ये-जा करत असतात. यामध्ये अनेक मच्छीमारांकडे साधी ओळखपत्रे देखील उपलब्ध नसतात. त्याचाच गैरफायदा घेऊन दहशतवादी शिरकाव करण्याची भिती वारंवार व्यक्त केली जाते. क्युआरकोडेड पीव्हीसी आधारकार्डावरुन संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती समोर येते. तो कोड स्कॅन केल्यावर ती सर्वांना पाहता येऊ शकतो.
महाराष्ट्र राज्यातील सातही समुद्र किनारी जिल्ह्यातील मच्छीमारांना क्युआर कोडेड आधार कार्ड अत्यावश्यक केले आहे. जे समुद्रात जाणारे मच्छीमार, खलाशी आहेत, त्यांना ते जवळ बाळगणे गरजेचे आहे. ते नसेल तर संबंधितांवर कडक कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा सहाय्यक मत्स्य विभागाकडून आधारला क्युआरकोड लिंक करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यासाठी मच्छीमारी संस्थांकडून माहीती मागवण्यात आली होती.