रत्नागिरीत मच्छिमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात पूर्वापार सुरु आहे. त्यामुळे प्रमुख व्यवसायांपैकी एक अशी त्याची गणना केली जाते. परंतु, नैसर्गिक आपत्ती आणि मच्छीमारी संबंधित समस्या संपुष्टात येण्याचे नावच घेत नाही आहेत. निसर्गाच्या संकटापुढे मागील दोन वर्षापासून, मच्छीमारी उद्योग ठप्प झाला असून, मच्छीमाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेट दिली.
नैसर्गिक बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या मिरकरवाडा बंदरात वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छिमारी नौका बाहेर काढण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मत्स्य विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
मिरकरवाडा बंदरातील मच्छिमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री उदय सामंत यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी ओंकार मोरे, सोहेल साखरकर, नुरा पटेल, विकास सावंत, रोशन फाळके व मच्छिमार बांधव उपस्थित होते. मिरकरवाडा बंदराच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता आहे. याबाबत सातत्याने मच्छिमारांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत आढावा घेण्यासाठी मंत्री सामंत यांनी संवाद साधला.
बंदरात अनेक जुन्या नौका उभ्या करुन ठेवलेल्या आहेत. काही नौकांचे अवशेष बुडालेले आहेत. त्या बाहेर काढल्या तर जेटीजवळ नियमित नौका उभ्या करण्यासाठी जागा होवू शकते. यासाठी मत्स्य विभागाकडून पावले उचलणे आवश्यक आहे. बंदरामध्ये एकावेळी नौका उभ्या करताना किंवा समुद्रात मासेमारीसाठी नेताना अनेकवेळा अडचण होते. काहीवेळा नौका बाहेर काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. हे टाळण्यासाठी विनावापर नौका किंवा त्यांचे अवशेष काढून टाकणे गरजेचे असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.