काही दिवसांपूर्वी यूट्यूबर बिंदास काव्या वडील ओरडल्याने घरातून पळून गेली होती. सोशल मिडियावर तिच्या अचानक अपहरण झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. परंतु, ती ज्या ट्रेनने गेली त्यातून दोन तासांमध्ये यूट्यूब स्टार काव्याला पोलिसांनी मध्य प्रदेशातील खांडवा याठिकाणाहून परत आणलं. त्यावेळी असं समोर आलं होतं की वडिलांचं तिच्या सोबत भांडण झालेलं आणि ते तिच्यावर ओरडले आणि त्यामुळे तिने घर सोडलं होतं. तिने पोलिसांसमोर तसा जबाबही नोंदवला.
मात्र या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. काव्या आणि तिच्या कुटुंबीयांनी तिचे सोशल मिडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी हा सारा खोटा प्रकार केल्याचे समोर आले आहे. हा सारा प्रकार पैशांसाठी झाल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हे दर्जाहीन कृत्य करण्यात आले आहे. दरम्यान शेरखाने यांनी केलेल्या आरोपानुसार काव्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.
काव्याचे वयाच्या १५ व्या वर्षी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ५ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ०९ सप्टेंबर रोजी ती गायब झाल्याचे समोर आलेले. तिच्या आई-वडिलांनी रीतसर तक्रारही दिली होती. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लेकीसाठी भावुक संदेशही शेअर केला. यांनतर काव्या मध्य प्रदेशमध्ये सापडल्यानंतर तिच्या चाहत्यांचाही जीव भांड्यात पडला. ती बेपत्ता झाल्यानंतर साधारण तिचे ४० हजार फॉलोअर्स वाढले होते.
शेरखाने–कटके यांच्या मते दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हा प्रकार करण्यात आला. पोलीस, रेल्वे आणि बाल न्याय मंडळ या यंत्रणांना त्यांनी वेठीस धरल्याचा आरोपही करण्यात आला आहे. चाहत्यांच्या भावनांशी खेळल्याचा आरोप काव्या आणि तिच्या आई-वडिलांवर केला जात आहे.