मंडणगड येथील मागील चार वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न गेली चार वर्षे रखडला असून शासनाचे दुर्लक्ष झाल्याने या पुलाचे भविष्य अंधारात आहे. अनेक पक्षांच्या नेत्यांनी प्रत्येक वेळी दुरुस्तीची आश्वासने देऊन देखील अद्याप त्या नादुरुस्त पुलाकडे एक प्रकारे कानाडोळाच झाला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या दापोली येथे झालेल्या मेळाव्यात महाड व दापोली मतदार संघाच्या आमदारांनी या पुलाच्या दुरुस्तीचा कामाचा प्रश्न उपस्थित केला असला तरी या संदर्भात कोणतीही आश्वासक घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. महाड येथील सावित्री पूल वाहून जाण्याच्या दुर्घटनेनंतर, पुलाला अनेक वर्ष झाल्याने तसेच पुलाची देखील दुरवस्था झाल्याने, सार्वत्रिक चर्चेत आलेल्या म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या नादुरुस्तीचा प्रश्न गेली चार वर्षे रखडलेला आहेच.
तत्कालीन बांधकाम मंत्र्यांनी पुलाचे सुदृढीकरणास ११ कोटींचा निधी मंजूर करूनही नंतरच्या काळात प्रशासकीय यंत्रणांनी संथ गतीने काम केल्याने, वारंवार निर्माण झालेल्या तांत्रिक समस्या, राज्यात झालेले सत्तांतर अशा विविध समस्यांमुळे गेल्या दोन वर्षात पूल तिसऱ्यांदा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
मंडणगड, दापोली तालुक्याच्या दृष्टीने या पुलाला विशेष महत्व आहे. विकासाच्या दृष्टीने महत्वाची भूमिका निभावत असलेला हा पूल अद्याप नादुरुस्तच असल्याने बंदच ठेवण्यात आला आहे. या प्रश्नासाठी तीन तालुक्यातील नागरिकांची संघर्ष समिती स्थापन करण्यात आल्याने मंडणगड दापोली व म्हसळा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष समितीच्या पुढील कार्यवाहीकडे लागले आहे.
तीन महिन्यापूर्वी झालेल्या सत्तातरांमुळे नवीन शासन नवीन धोरण ठरवणार ही बाब ध्यानात घेता या पुलाचे पर्यायाने दापोली-मंडणगड तालुक्यातील सर्वात मोठ्या रहदारीचे भविष्यच एका अर्थाने अंधःकारात सापडले आहे. खासदार सुनील तटकरे यांनी पर्यायी नवीन पुलाचे अंदाजपत्रक तयार होत असल्याचे म्हाप्रळ येथील भेटीदरम्यान सांगितले.