रत्नागिरी तालुक्यामध्ये शेती आणि फळभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे, त्यांची निगा राखण्याला देखील विशेष महत्व दिले जाते. त्यामध्ये योग्य प्रमाणात खात पाणी, किटकनाशक, औषध फवारणी इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश करण्यात येतो. तसेच विविध उपाय योजना देखील आजकालचे प्रगत शेतकरी अवलंबताना दिसतात.
सध्या फवारणी करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. आणि शेतकरी देखील अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यामध्ये पुढाकार घेत आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व माऊली ग्रीन आर्मी महाराष्ट्र राज्य पर्यावरण समिती, तसेच रत्नागिरी कृषी विभाग यांच्या विद्यमाने हे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. गोळप येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश साळवी आणि रफिक मुकादम यांच्या शेती क्षेत्रावर ड्रोनद्वारे पीक संरक्षण फवारणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या वेळी ड्रोनविषयी परिपूर्ण माहिती, ड्रोनमुळे मजूर व कीटकनाशके, बुरशीनाशकांची होणारी बचत आदीची माहिती देण्यात आली.
या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, महाराष्ट्र राज्य पर्यावरण समितीचे बाळासाहेब सानप व टीम तसेच कृषी विभाग रत्नागिरी सर्व अधिकारी व कर्मचारी आणि पावस पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
या वेळी सानप यांनी ड्रोनद्वारे फवारणी पिकाच्या सर्व भागावर औषध पोचवते. उंच सखल भागावर समान उंचीवरून फवारणी होते. तसेच कीटकनाशक औषध संपणाऱ्या ठिकाणाची नोंद करता येते. हवेच्या दाबामुळे पानाच्या दोन्ही बाजूला समान फवारणी होते. अशा तऱ्हेने भविष्यात ड्रोनद्वारे पीक संरक्षण औषध फवारणी, आंबा बागायतदारांना चांगल्याप्रकारे कशा तऱ्हेने फायदेशीर होईल याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे करून दाखवली. या परिसरातील हा पहिलाच प्रयोग असल्याने बागायतदार यांनी समाधान व्यक्त केले.