राजकारणात चाललेल्या उलथापालथीमुळे, शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सुरु असलेल्या उभ्या वादामुळे नेते मंडळी, पदाधिकारी एकमेकांवर चिखल फेक करताना दिसत आहेत. अनेक आमदार खासदार तर एकमेकांवर पातळी सोडून देखील अतिशय खालच्या दर्जाच्या कमेंट्स करताना दिसून येत आहेत. आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि कुटुंबावर केलेल्या टीकेमुळे त्यांच्या विरोधात सर्वत्र टीका केली जात आहे. राणे कुटुंबाला टार्गेट करून जाधव यांनी टीका केली होती. अनेक ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे.
लांजा तालुका भाजपा पदाधिकार्यांच्यावतीने गुरुवारी दि. ६ ऑक्टोबरला शहरात, निषेध असो निषेध असो, भास्कर जाधवांचा निषेध असो, अशा गगनभेदी घोषणा देत आमदार भास्कर जाधव यांचा जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी भास्कर जाधव यांच्या फोटोला जोडे मारून व त्यांचा फोटो जाळण्यात आला. दसरा मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून लांजा तालुका भाजपाच्यावतीने आमदार भास्कर जाधव यांच्या फोटोला चपला मारून आणि त्यांचा फोटो जाळून जोरदार निषेध करण्यात आला.
”राणे साहेब अंगार है, बाकी सब भंगार है।” अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश खामकर, इक्बाल गिरकर, शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे तसेच नगरसेवक संजय यादव, मंगेश लांजेकर, पदाधिकारी विराज हरमले, अजय गुरव, चंद्रकांत मांडवकर, बाबा लांजेकर, बावा राणे, सुयोग तोडकरी, शेखर सावंत आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.