मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरा भाईंदर महापालिकेत भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे. पालिकेतील चार नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. तसेच रोहा-श्रीवर्धन मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना नेते अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अवधूत तटकरे हे खासदार सुनील तटकरेंचे पुतणे आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तटकरे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. दरम्यान, तटकरे यांच्या प्रवेशानंतर आता ठाकरे गटातील एक विश्वसनीय आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
ठाकरे गटातील राजापूर-लांजाचे आमदार राजन साळवी यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साळवी यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. साळवी हे राजापूर-लांजा विधानसभेचे आमदार आहेत. त्यांची सुरक्षा अचानक वाढविण्यात आल्याचे कारण अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र, सुरक्षा वाढवल्याने ते शिंदे गटात जाणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.
राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांनी साळवींना सुरक्षा का दिली असावी यावरून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटातील तीन नगरसेवक आणि एक कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने, शिवसेना ठाकरे गटाला एक प्रकारे धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर अशा घटना घडत असल्याने, शिवसेना ठाकरे गट आपले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे.