मागील दोन वर्षांपासून कोकणातील रेल्वे प्रवाशांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या समस्या जैसे थे आहेत. या समस्या रेल्वे मंत्रालय, रेल्वे प्रशासनाकडे मांडूनही त्यावर कार्यवाही होत नाही. रेल्वे राज्य मंत्री व कोकणातील संबंधित लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा सुरू आहे. वारंवार पत्रव्यवहार व प्रत्यक्ष चर्चा करूनही समस्यांवर तोडगा निघत नसल्याने कोकण विकास समिती आक्रमक झाली आहे. कोकण विकास समितीने पुन्हा एकदा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या चर्चगेट येथील कार्यालयात स्मरणपत्रे दिली असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मागण्यांमध्ये त्यांनी दादर आणि चिपळूण दरम्यान रोहा ते चिपळूण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबणारी नवीन नियमित गाडी सुरू करणे, मुंबई (दादर) आणि सावंतवाडी दरम्यान दोन्ही दिशांना दिवसा धावणारी व सर्व तालुक्यात थांबणारी नवीन नियमित गाडी सुरू करणे, जनशताब्दी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस करमाळी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस, हिसार कोईम्बतूर एक्स्प्रेस, तिरुनलवेली दादर एक्स्प्रेस आणि मंगळुरु-मुंबई एक्स्प्रेस खेड येथे थांबा देण्यासाठी काही डबे राखीव ठेवून दिवा-सावंतवाडी दिवा एक्स्प्रेसचा दादर किंवा मुंबई सीएसएमटीपर्यंत विस्तार करणे, रत्नागिरी-दिवा फास्ट पॅसेंजरचा एक रेकमध्ये रेल्वेकडे हस्तांतरित करून सिंहगड एक्स्प्रेससोबत रेक शेअरिंग करून मुंबई सीएसएमटी/दादरपर्यंत विस्तार करणे आदी मागण्याचा यात उल्लेख केलेला आहे.
या मागण्या पूर्ण करण्यास उशीर झाल्यास भविष्यात प्रवाशांचा उद्रेक होऊन उग्र जन आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा दिला. आंदोलन झाल्यास सर्व प्रवासी संघटना एकत्र येतील व कोकण विकास समितीही त्यांना पाठिंबा देईल. या वेळी संस्थापक अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांच्यासोबत अक्षय मधुकर महापदी व प्रथमेश प्रभू उपस्थित होते.