परतीचा पाऊस पाठ सोडत नसून तालुक्यात मागील दहा-बारा दिवसांपासून पाऊस सक्रीय आहे. रत्नागिरी व परिसरात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. कानठळ्या बसवणारा विजांचा प्रचंड कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने घराबाहेर अथवा बाजारात असणाऱ्या नागरिकांची व व्यवसायिकांची त्रेधातीरपीट उडाली आहे.
विजांच्या कडकडाटासह सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या तुफान पावसाचा फटका हा पालू गावाला बसला आहे. पावसामुळे काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी येथील भातशेतीत घुसून शेतकऱ्यांचे भातशेतीचे नुकसान झाले आहे.
गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सण काही दिवसांवर आला असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे भात पीक काढणीस आले आहे. परंतु मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने संपूर्ण जिल्हात धुमशान घातले आहे. लांजा तालुक्यात तर शेतामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाच्या पाण्याने धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी पाऊस जाण्याची वाट बघत असलेले शेतकऱ्यांची तयार झालेली भात पिके शेतातच उभी आहेत. पावसामुळे भात पीक कापायचे कसे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
अशा परिस्थितीत रोज सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस कोसळला. सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या दरम्याने कोसळलेल्या तुफानी पावसाने येथील काजळी नदीला पूर आला. पुराचे पाणी थेट येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. त्यामुळे तयार झालेले भात पीक हे पूर्णपणे पुराच्या पाण्याने आडवे झाले आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंत जोरदारपणे कोसळत होता. नदीच्या पुराच्या पाण्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.