तब्बल ५५ वर्षांचा विक्रम मोडत मुंबईत मान्सूनने तुफानी एन्ट्री केली. पहिल्याच पावसाचा तडाखा इतका मोठा होता की सकाळी ९ ते १० या एका तासात जणूकाही ढगफुटी झाली. या एका तासात सुमारे ८० मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सखल भागांत अनेक ठिकाणी पाणी साचले आणि मुंबई अक्षरशः ‘तुंबली. या पावसाचा परिणाम मुंबईची लाईफलाईन मानल्या गेलेल्या लोकलवर झाला आणि रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली. रस्तेवाहतूकही कोलमडल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी काम-धंद्यावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. दादर, माटुंगा, प्रभादेवी, गिरगांव, भांडुप, घाटकोपर, विरार आदी अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी तुंबल्याने नागरिक अडकून पडले.
गुडघाभर पाण्यातून वाट काढताना नागरिकांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र पहायला मिळाले. काही झोपड्यांसह घरांमध्ये तुंबलेले पाणी शिरल्याचे वृत्त होते. मुंबईत अजूनही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागने मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यालादेखील रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत जागोजागी तुंबलेले पाणी आणि त्याचा रस्तेवाहतुकीसह रेल्वेसेवेवर झालेला परिणाम लक्षात घेता नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रांतील जनजीवन पावसामुळे कोलमडले आहे.
मुंबईत मान्सून पोहोचला – यंदा अपेक्षेपेक्षा मान्सून लवकर दाखल झाला आहे. रविवारी महाराष्ट्रात मान्सूनने एन्ट्री केली. तळकोकणात देवगडमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला. मुंबईत एक-दोन दिवसांत मान्सूनचे आगमन होईल, असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र तो फोल ठरवत रविवारी २५ मे ला रात्रीच मुंबईत मान्सून पोहोचला. रात्रभर कोसळलेल्या पावसाने सोमवारी पहाटेच्या सुमारास काहीशी विश्रांती घेतली. मात्र सोमवारी सकाळी ७वाजल्यापासून पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसू लागल्याने मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबले.
रेल्वेला लेट – या पावसाने मुंबईत आणि उपनगरातील रेल्वेवाहतूक विस्कळीत झाली. रस्तेवाहतूकही कोलमडली. ठाणे ते सीएसएमटीकडे जाणारी रेल्वेची जलद वाहतूक ४० मिनीटाने उशीराने सुरू होती. ठाणे ते कल्याण धीमी वाहतूक १५ मिनीटे उशीरा धावत होती. हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा सोमवारी सकाळी बंद पडली होती. मात्र रेल्वेच्या आपदग्रस्त पथकाने युध्दपातळीवर काम करत ही सेवा दुपारी पूर्ववत केली. मात्र हार्बर लाईनवरही वाहतूक उशीराने सुरू होती.
जीवनवाहिनी कोलमडली – मुंबईची लाईफलाईन मानली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनीच एकप्रकारे कोलमडली. मुंबईतील अनेक रेल्वेस्टेशनवर पाणी साचले होते. ट्रॅकवरही पाणी आल्याने काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या. तर काही लोकल रद्द करण्यात आल्या.
मुंबईकरांची दैना – मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी तुंबल्याने तेथील रहिवाशांची आणि कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची दैना उडाली. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांचे अक्षरशः हाल झाले. दादर, हिंदमाता परिसरात तुफान पाणी साचले होते. रस्त्याला जणूकाही नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परळ येथे रस्त्यावन आलेल्या पाण्यामध्ये काही दुचाक वाहून गेल्याचे वृत्त आहे. अनेकजण य पाण्यात अडकले होते. मदत पथकाने त्यांना बाहेर काढले.
बेस्टलाही फटका – मुंबईची लाईफलाईन मानली गेलेली लोकलसेवा जशी विस्कळीत झाली, तशी बेस्टची सेवाही कोलम डली. बेस्टच्या अनेक डेपोंमध्ये पाणी साचले. तसेच ठिकठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट सेवेने सोमवारी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद केले, तर काही मार्ग वळवावे लागले. सायन, गांधी मार्केट, वडाळा, हिंदमाता येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने बेस्टला मार्ग वळवावे लागल्याचे प्रशासनाने सांगितले. गांधी मार्केटमध्ये तर गुडघाभर पाण्यातून कसरत करत मार्ग काढताना नागरिकांच्या नाकीनऊ आल्याचे पहायला मिळाले. वडाळा उड्डाणपूलाच्या खाली पाणी तुंबले होते.
भुयारी मेट्रोलाही फटका – या मुसळधार पावसाचा फटका भुयारी मेट्रोलाही बसला. आचार्य अत्रे चौक, वरळी स्थानकात पाणीच पाणी साचले. लोकलची तिन्ही मार्गावरील सेवा मध्य, हार्बर आणि पश्चिम विस्कळीत झाली होती.
मुंबईत पावसाचा रेड अलर्ट – या पावसाचा मुंबईतील विमान उड्डाणांवर परिणाम झाला. अनेक विम ाने रद्द झाली आहेत. तर काही विमाने उशीराने मार्गस्थ होतील असे घोषित करण्यात आले आहे. सोमवारप्रमाणेच मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तविण्यात आला असून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान रविवारी रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर दुपारनंतर मात्र थोडासा ओसरल्याने किंचीत दिलासा मिळाला आहे.