दिवाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी भाऊबीज झाल्यानंतर अनेक पर्यटक कोकणात आले असून, गणपतीपुळेमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसामध्ये सुमारे ५० हजार पर्यटकांनी भेट दिल्याची माहिती मिळाली आहे. गणपतीपुळे मंदिरात याची नोंद झाली आहे. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे किनार्यांवरील व्यावसायिकांसह हॉटेल, लॉजिंगवाल्यांमध्ये देखील मागील २-३ वर्षे ठप्प झालेल्या व्यवसायाला गती मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. पर्यटन हंगाम असाच बहरत राहिला तर कोरोनातील नुकसान भरून निघणे शक्य होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मागील दोन वर्षे कोरोनातील प्रतिबंधामुळे पर्यटन व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामधून बाहेर पडण्यासाठी अनेक आर्थिक संकटातून जावे लागले होते. यावर्षी मे महिन्याच्या हंगामात पावसाचे सावट असल्याने, त्यामुळे मे महिन्यात २० दिवस पर्यटकांचा राबता होता. या हंगामात पर्यटकांची गर्दी असल्याने किनार्यावर सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीने दहा जीवरक्षक सुरक्षेसाठी नियुक्त केले आहेत.
आता दिवाळीच्या सुट्टीला आरंभ झाला आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पर्यटकांची पावले गणपतीपुळेकडे वळू लागली होती; पण खर्या अर्थाने २७ ऑक्टोबरपासून पर्यटकांची गर्दी वाढली. हा हंगाम ६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील, असा व्यावसायिकांचा अंदाज आहे. दिवाळी हंगामावरही पावसाचे सावट होते; पण सुदैवाने दिवाळीच्या पूर्वसंध्येला मान्सून परतला. त्यामुळे व्यावसायिकांनीही निःश्वास सोडला.
गुरुवारी दिवसभरात पंचवीस हजार लोकांनी गणपतीपुळे मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारीही सकाळपासूनच भक्तगणांचा मंदिरातकडे ओघ सुरूच होता. पश्चिम महाराष्ट्र, सातारा, पुणे, मुंबईतील सर्वाधिक पर्यटकांनी हजेरी लावलेली होती. यामध्ये निवास करणार्यांची संख्या अधिक असल्यामुळे लॉजिंगवाल्यांकडून समानधान व्यक्त केले जात आहे. किनार्यावरील स्थानिक विक्रेते, खेळणी आणि प्रसाद विक्रेते यांच्याकडेही पर्यटक खरेदी करताना दिसत आहेत.