रत्नागिरी मिऱ्या बंदर येथे ऐन गणेशोत्सवात गाजलेल्या स्वप्नाली सावंत हत्या प्रकरणात, आता काही राजकीय मंडळींची देखील चौकशी केली जाणार आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी मयत स्वप्नाली यांचा पती भाई सावंत याच्या मोबाईलचा सीडीआर मागवला होता. त्यानुसार स्वप्नाली सावंत खून प्रकरणात काही राजकीय मंडळींची देखील चौकशी होणार आहे. या प्रकरणात आता पोलिसांना डीएनए चाचणीच्या अहवालाची देखील प्रतिक्षा आहे.
साधारण दीड महिन्यापूर्वी रत्नागिरीतील स्वप्नाली सावंत हत्या प्रकरण चांगलंच गाजलं होतं. शिवसेनेच्या पंचायत समितीच्या सभापती राहिलेल्या स्वप्नाली सावंत ऐन गणेशोत्सवात बेपत्ता झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. त्यानंतर त्यांच्या पतीने स्वप्नाली गायब असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. पण, याच प्रकरणात पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांच्या पतीसह आणखी दोघांना अटक केली. यावेळी शिवसेनेच्या उपतालुका प्रमुख राहिलेल्या स्वप्नाली यांचा पती भाई सावंतने आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
जिल्ह्यात एवढ्या क्रूरपणे करण्यात आलेल्या हत्येचे, पोलिसांना काही पुरावे सापडल्याने स्वप्नाली यांच्या बेपत्ता प्रकरणाला वेगळेच वळण लागत गेले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा पहिल्यांदा गळा आवळून खून करण्यात आला, त्यानंतर त्यांचा मृतदेह घराच्या मागील बाजूला जाळण्यात आला. पण, पोलिसांनी यावेळी घटनास्थळावरुन पुरावे देखील मिळाले आणि भाई सावंतचा सारा डाव समोर आला.
सुरुवातीला भाई सावंतने पोलिसांच्या तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण, स्वप्नाली यांच्या आईने केलेल्या पाठपुराव्यामुळे, त्याने अखेर पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली. शांत डोक्याने प्लान करून त्याने आपल्या पत्नीचा खून केला.
दरम्यान, सततच्या कौंटुबिक वादातून भाई सावंतने स्वप्नाली सावंत यांचा खून केला. दरम्यान आता या साऱ्या प्रकरणात भाई सावंतच्या संपर्कात असणाऱ्या अनेक राजकीय मंडळींची चौकशी होणार असल्याचे समोर आले आहे.