मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबईतील पीएमएलए कोर्टातून १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. सायंकाळी ७ वाजता ते आर्थर रोड कारागृहातून बाहेर येतील. अंमलबजावणी संचालनालयाने या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे उद्या सुनावणी घेणार आहेत. न्यायालयाने तात्काळ सुटकेच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालय म्हणाले सत्र न्यायालयाने निर्णय घेण्यासाठी एक महिना घेतला आहे, मग तुम्ही आमच्याकडून एका दिवसात निर्णय घेण्याची अपेक्षा कशी करू शकता.
ईडीने ३१ जुलै रोजी राऊताना अटक केली होती. यापूर्वी ९ तास चौकशी केली होती. राऊत यांची ईडीने २८ जून रोजी देखील चौकशी केली होती. त्यांच्या घराच्या झाडाझडती दरम्यान ईडीला ११.५ लाख रुपये रोख सापडले. राऊत किंवा त्यांच्या कुटुंबीयांना या पैशाचा स्रोत सांगता आला नाही. संजयवर १,०३९ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी २८ जून रोजी ईडीने संजय राऊत यांची पहिल्यांदा चौकशी केली. त्यानंतर १ जुलै रोजी एजन्सीने संजय राऊत यांची दहा तास चौकशी केली. यादरम्यान मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला.
संजय राऊत यांचा भाऊ सुनील राऊत आणि त्यांचे कायदेशीर पथक सत्र न्यायालयाकडून मिळालेल्या जामीन आदेशाची प्रत घेऊन सायंकाळी पाच वाजता आर्थर रोड कारागृहात पोहोचले. तो कागदोपत्री काम पूर्ण करत आहे. इकडे राऊत यांच्या समर्थकांना जामिनाची माहिती मिळताच ते आर्थर रोड कारागृहाबाहेर जमले. भगवे ध्वज फडकवत गुलाल उधळून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कारागृहाबाहेर समर्थकांची गर्दी पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुनील राऊत यांनी सांगितले की, संजयची प्रकृती ठीक नाही. तुरुंगातून सुटताच ते शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काही ठिकाणी जाणार आहेत. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.