म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक गेल्या तीन वर्षापासून खंडित असल्याने मंडणगड तालुक्याच्या अर्थकारणाचे चक्र ठप्प होत असल्याने समाजातील प्रत्येक घटक हे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील राहत आहे. गेल्या तीन वर्षापासून पुलावरील वाहतूक सातत्याने बंद ठेवण्यात आल्याने तालुक्याचे अर्थकारण थंडावले आहे. सर्व क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडला आहे.
शहरातील बाजारपेठेतील व्यापाराची आर्थिक घडी अर्ध्यावर खाली आली आहे. ही बाब लक्षात घेता पुलावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. ७ नोव्हेंबरला शहर व्यापारी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात निवेदन देऊन व्यापाऱ्यांची सद्यःस्थिती समोर मांडली आहे. त्याच बरोबर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात न आल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
या विषया संदर्भात तहसील कार्यालयात चर्चा करण्यासाठी व्यापारी संघटनेला बोलावण्यात आले होते. यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर यांच्या दुकानात सकाळी शहरातील दोनशेहून अधिक व्यापारी एकत्र आले. यानंतर बाजारपेठेतून मोर्चाला सुरवात करण्यात आली. जागृती करण्यासाठी व्यापाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाला जागे करा आंबेत पूल खुला करा, व्यापारी संघटनेचा विजय असो, वेळेचा पैशाचा अपव्यय टाळा आदी घोषणा देत तहसील कार्यालयावर व्यापाऱ्यांचा मोर्चा धडकला.
तहसील कार्यालयात तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांची व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी तहसीलदारांसमवेत चर्चा करण्यात आली व एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाचा इशाराही देण्यात आला. या वेळी शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद काटकर, उपाध्यक्ष श्रीपाद कोकाटे, जिल्हा प्रतिनिधी दीपक घोसाळकर, खजिनदार दिनेश साखरे, वैभव कोकाटे,निलेश गोवळे, सचिव कौस्तुभ जोशी, यांच्यासह शहरातील व्यापारी उपस्थित होते.