रत्नागिरीतील शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीसाठी आलेले आमदार जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले कि, राज्यातील नवीन आलेली सत्ता विश्वासघाताने झाली आहे, वैधानिक मार्गाने नाही. मागील अडीच वर्षे सत्ता न मिळाल्याचा सूड शिंदे गटाला बरोबर घेऊन भाजप काढत आहे. आणि स्वत:च्या मान मर्जीसाठी कायदा देखील बाजूला ठेवला जात आहे. विकासासाठी सत्तेचा उपयोग न करता केवळ सुडासाठीच होत आहे.
परंतु, लवकरच भाजपच शिंदे गटाला सुरूंग लावेल, असे सांगत शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांवर असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केला. त्यासाठी विरोधकांचे चारित्र्यहनन देखील केले जात आहे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. परंतु, हा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध पक्षांचे १३ आमदार शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नावर आमदार जाधव म्हणाले, भाजपच शिंदे गटाला सुरंग लावेल अशी स्थिती आहे. याचा अंदाज शिंदे गटालाही आला आहे. मागील निवडणुकीत भाजपने शिवसेनेसोबत राहून विरोधात काम केले आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत ते विश्वासघात करू शकतात, हे शिंदे गटाला माहिती आहे. त्यासाठीच अन्य पक्षातील आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे खोटे दाखवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
चाळीस आमदार, बारा खासदार फोडून शिवसेना नेस्तनाबूत होईल, असे भाजपला वाटले होते; मात्र तो फोल ठरला असून, अंधेरीच्या निवडणुकीत त्याचा चांगलाच अंदाज भाजपलाही आला आहे. गेल्या काही महिन्यात ठाकरे यांच्याकडील जनाधार वाढत आहे. सर्व जातीधर्माचे लोक आणि तिरस्कार करणाऱ्या पक्षाचे प्रतिनिधी आज शिवसेनेच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यात मुस्लिम समजाचाही समावेश असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.