मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चाळीस आमदारांसह गुवाहटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले आहेत. श्रद्धा आणि मनापासून आम्ही सर्वांनी कामाख्या देवीची पूजा केली. येथे आल्याने सर्वांना समाधान मिळाले असून सर्वजण आनंदात आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर दिली. कामाख्या देवीच्या आशिर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नात तयार झाले आहे. आसाममधील जनतेला आनंद, सुख, समुद्धी मिळत आहे. तसेच महाराष्ट्राच्या जनतेची सर्व संकटं दूर व्हावीत, असेही देवीच्या चरणी प्रार्थना केल्याचे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
त्यावरून शिंदे गटावर ठाकरे गटाने निशाणा साधलाय. कामाख्या देवी न्यायाची देवता आहे. चाळीस लोक तेथे गेले आहेत. आम्हाला खात्री आहे, त्यांचा कामाख्या देवी नक्की न्याय करेल, असा घणाघात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर केला आहे.
मुंबईत आसाम भवन बांधण्याबाबत राऊत म्हणाले, मला असं वाटतं नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे. महाराष्ट्रात सगळ्याच राज्यांना जागा हवी आहे पण महाराष्ट्राला कधी कोण जागा देणार आहे का ? कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर आणि जत खेचून घ्यायला निघाले आहेत. गुजरातचे आमचे उद्योगधंदे पळवित आहे. खोके सरकार म्हणून मान्यता मिळालेले सरकारचा आणि आसामचे काय नाते निर्माण झाले आहे माहीत नाही.
दोन पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचे नाते जुळले असेल. आसामचे मुख्यमंत्री हे आधी शिवसेनेत होते, आता ते भाजपमध्ये आहेत. आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आधी शिवसेनेत होते. आम्हाला कधी बोलावलं नाही आसामला. कारण आम्ही कधी पक्षांतर केलं नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री शिंदे, आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्याबाबत राऊत म्हणाले, कामाख्या देवी ही न्यायतेची देवता आहे, अशी आख्यायिका आहे. आम्हाला खात्री आहे की चाळीस लोकांबाबत कामाख्या देवी नक्की न्याय करेल.