राज्यभरात गुरांवर आलेला लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव अद्याप तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत पोहचला नव्हता. राज्यात अनेक ठिकाणी जनावरांमध्ये लक्षणे आढळल्या नंतर पशुसंवर्धन विभागाने लसीकरणही हाती घेतले होते; मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव सुरु झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. यावर नियंत्रणासाठी यासाठी पशुसंवर्धन विभागाला काही अंशी यश आले आहे; मात्र पशुसंवर्धन विभागातील ७३ पदे रिक्त आहेत. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळावर लसीकरण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
राज्यभर थैमान घालणारा लम्पी आजार सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचला आहे. सावंतवाडी, कुडाळ, वैभववाडी, कणकवली, दोडामार्ग व वेंगुर्ले या तालुक्यात या आजाराची गुरे मिळाली आहेत; मात्र पशुसंवर्धन विभागासमोर सततच्या रिक्त पदांमुळे अधिकतम ताण येण्याची भीती जाणवत आहे. पशुधनाचे नुकसान होऊ नये, यासाठी तातडीने योग्य ती उपाययोजना करावी तसेच रिक्त असलेली पदे भरण्यासाठी पाठपुरावा गरजेचा आहे, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी शेतीसोबतच पशुधनाचा देखील पूरक व्यवसाय करतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागायला मदत होते. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यात एकूण ७७ दवाखाने आहेत. जिल्ह्यातील पशुपालकांना पशुसंवर्धन विभागाच्या असणाऱ्या दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. लम्पीबाधित तालुक्यात उपाय योजण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. बाधित जनावरांना लसीकरण केले जात आहे. बाधित गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील जनावरांनाही लसीकरण पूर्ण केले जात आहे. त्यामुळे बाधित जनावरे बरी झाली आहेत.
अर्थात, लम्पी आजाराचा प्रभाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला काही अंशी यश मिळाले असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ज्या भागात प्रादुर्भाव झाला, त्यात संपूर्ण यंत्रणा काम करत असल्याचे चित्र आहे. परंतु, रिक्त पदांमुळे मात्र जनावरांना लसीकरण करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती असल्याने पशुपालकांमध्ये धास्ती आहे.