रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक लहान मोठे गुन्हे घडत असतात. काही वेळा छोट्या मोठ्या चोऱ्या, खून, बलात्कार, दरोडा, हाफ मर्डर, मारहाण अशा अनेक गुन्ह्यांची नोंद होत असते. पोलीस यंत्रणा आपले काम व्यवस्थित पार पाडत असते. परंतु काही वेळा पोलिसांना गुंगारा देऊन काही गुन्हेगार पळून जातात. त्यांना फरार घोषित केले जाते. पण त्यांची शोध मोहीम सुरु असते.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी जिल्ह्यातील फरारी आरोपींना शोधण्याची मोहीम जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्याचे ठरवण्यात आले आहे. पाहिजे आणि फरारी आरोपी शोध ही संकल्पना रत्नागिरीमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पोलिसांचे एक पथक देखील तयार करण्यात आले असून, या पथकाद्वारे पोलिस शोध घेत असलेले आणि फरार आरोपींचा शोध घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १९७२ साल ते २०२१ सालापर्यंतच्या फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींची शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील सर्व आरोपी विविध प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकातून या सर्व गुन्हेगारांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. जास्तीत जास्त माहिती घेऊन या सर्व आरोपींचा शोध घेण्यास स्रुरुवात केलेली आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांचे विशेष पोलीस पथक आहे़, त्यामध्ये पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, पोलीस नाईक चंदन जाधव, प्रवीण खांबे, सत्यजीत दरेकर, पोलीस कॉन्स्टेबल रियाज मुजावर आणि ओमकार पवार यांचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्या काही वर्षांपासून पोलिसांना हवे असलेले १९४ व ३२ फरारी आरोपींचा हे पथक शोध घेणार आहे. हे पथक स्थापन झाल्यानंतर या पथकाने ११ वर्षापूर्वी सावर्डे येथे अपघात करून फरार झालेल्या सोराब खान याला १४ जून २०२१ रोजी धुळे येथून अटक केली आहे.