मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण मागील १२ वर्षापासून रखडले आहे. या १२ वर्षासह मागील २० वर्षात या मार्गावर हजारो अपघात झाले आणि लाखो लोकांनी जीव गमावला. जर मुंबई आणि नागपूरला जोडणारा मोठ्या लांबीचा समृद्धी महामार्ग विक्रमी अल्प वेळेत पूर्ण होऊ शकतो तर त्यापेक्षा कमी अंतर असलेला मुंबई-गोवा महामार्ग इतके वर्ष का रखडला, असा थेट सवाल आमदार शेखर निकम यांनी राज्य सरकारला विचारला आहे. या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अधिवेशनात त्यांनी आपल्या हाती फलक घेऊन आंदोलन केले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारचे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यानी हा “वेगळा” मार्ग निवडला. या अनोख्या आंदोलनाची चर्चा संपूर्ण कोकणात आणि अधिवेशनातही सुरू होती. अपघातग्रस्त कोकणी माणूस कोणाची जबाबदारी?? आमदार शेखर निकम यांनी अशाप्रकारे फलक झळकवत सरकारचे मुंबई-गोवा महामार्गाकडे लक्ष वेधले.
समृद्धीचा प्रवासशून्य अपघाताची खबरदारी तर मग अपघातग्रस्त कोकणी माणूस कोणाची जबाबदारी, मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार अशा आशयाचे फलक झळकावत आमदार निकम यांनी नागपूर येथे अनोखे आंदोलन केले. अत्यंत कमी वेळेत जर समृद्धी महामार्गासारखा महामार्ग होऊ शकतो तर मग त्याच्यापेक्षा लांबीने कमी असलेला कोकणाचा रस्ता का होत नाही? राज्य सरकारने वैयक्तिक लक्ष घातल्याशिवाय केंद्र सरकार या रस्त्याकडे पाहणार नाही, असे निकम यांनी या वेळी सांगितले.