५ हजार रूपये शिमग्याचं पोस्त म्हणून द्या, अशी मागणी करत फर्निचर विक्रेत्या ‘दुकानदाराला त्याची मान धरुन मारहाण करणाऱ्या तरुणांना जमावाने चांगलाच चोप दिल्याची घटना सोमवारी सायंकाळी ५ वा.च्या सुमारास काँग्रेस भुवन परिसरात घडली. भर रस्त्यात हाणामारी सुरू झाल्यानंतर शिम गोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. याचदरम्यान पोलीस घटनास्थळी धावले आणि दुकानात घुसून धुडगूस घालणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतले.
सोमवारी रात्री १२ वा. नंतर रत्नागिरीतील बारावाड्यांच्या शिम गोत्सवाला सुरुवात होणार आहे. या शिमगोत्सवाची रंगत दोन दिवसांपासून रत्नागिरीत पहायला मिळत आहे. चाकरमानीदेखील शिमगोत्सवासाठी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे हौशा- नवशांची या शिमगोत्सवाला गर्दी केली आहे.
तळीरामांसाठी शिमग्याचा सण म्हणजे जणू काही पर्वणीच. अशाच तळीरामांकडून शहरातील काँग्रेस भुवन परिसरात राडा झाला, मात्र ५ हजार रुपयांचे पोस्त मागणं ४ तरुणांना चांगलेच महागात पडले आहे.
चार तरुण अगदी तर्रर्र होऊन काँग्रेस भुवन परिसरात सायंकाळच्या वेळेस आले होते. या चारही तरुणांच्या पोटात ‘आक्काबाई’ चांगलीच संचारली होती. बेभान झालेले हे तरुण एका फर्निचरच्या दुकानात शिरले. अगदी राजेशाही एन्ट्री’ या दुकानात केली. दुकानात गेल्यानंतर दोघेजण कोचावर बसले तर दोघेजण खुर्च्यावर जाऊन बसले.
गिऱ्हाईक आल्याची समज जे चार तरुण· दुकानात शिरले ते गिऱ्हाईक असावेत, असा समज दुकान मालकाचा झाला. म्हणून दुकानमालक काय हवंय? विचारण्यासाठी पुढे धावला. यावेळी दुकानदाराने त्यांना विचारणा केली. यातील एकाने सांगितले, शिमगा आहे काय ते बघा..!
शिमगोत्सवात पोस्त मागण्याची परंपरा आहे. मात्र या परंपरेला फाटा देत काहीजणं आता खंडणीच वसुल करण्याचा प्रयत्न करत असतात. या दुकान मालकाकडे ५ हजार रुपयांचे पोस्त या तरुणांनी मागितले आणि त्या दुकानदाराला अक्षरशः घाम फुटला.
पोस्त देण्यास नकार ५ हजार रुपयांचे पोस्त देण्यास दुकानदाराने नकार दिला. त्यानंतर दुकानात शिरलेले चारही तरुण लालेलाल झाले आणि त्यांनी दुकानमालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. बोलाचाली सुरू असताना प्रकरण हमरीतुमरीवर जाऊन पोहोचले. बघता बघता या चारही तरुणांनी दुकानमालकाची मान पकडली.
दुकानमालकाने ५ हजारांचे पोस्त देण्यास नकार दिल्यानंतर त्या चारही तरुणांनी फर्निचर दुकानात अक्षरशः धुडगूस घातला. येथील एक कपाट पाडून नुकसान केले. यावरच न थांबता एक देव्हारादेखील यातील एका तरुणाने उडवून दिला.
फर्निचरच्या दुकानात हाणामारी सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील नागरिक दुकानमालकाला वाचवण्यासाठी पुढे धावले. यावेळी या तरुणांनी पुढे आलेल्या लोकांसोबत अरेरावी केली आणि मग काय जे व्हायचे ते पुढे घडलेच.
पब्लिक पुढे धावल्यानंतर अरेरावी करणाऱ्या त्या चारही तरुणांना पब्लिकने चांगलाच चोप दिला. १५ मिनिटे दे दणादण सुरूच होते. काँग्रेस भुवनच्या नाक्यावर हाणामारी सुरू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी धावले.
धुडगुस घालणाऱ्या चारही तरुणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दुकानात घेतल्यानंतर तरुणांची पाठराखण करण्यासाठी काहीजण त्या दुकानमालकाशी समझोता करण्यासाठी धावले होते. मात्र दुकानमालकाने त्याला नकार दिला होता. पोलिसांनी साऱ्यांना पोलीस स्थानकात नेल्यानंतर उशिरापर्यंत याबाबत कार्यवाही सुरु होती.